Home क्राईम पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह कंकराज धरणात सापडला

पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह कंकराज धरणात सापडला

0
12

पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील शेवगे बुद्रुक येथील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या २२ वर्षीय समाधान चुडामण भिल या तरुणाचा मृतदेह रविवारी (ता. २) सकाळी कंकराज धरणाच्या पाण्यात आढळून आला. गेल्या दोन दिवसांपासून प्रशासन आणि ग्रामस्थांकडून सुरू असलेल्या शोध मोहिमेचा अखेर दुर्दैवी शेवट झाला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

शुक्रवारी (ता. ३१) सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसामुळे शिवल्या नाल्याला अचानक पूर आला होता. या पुराच्या पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असताना समाधान भिल याचा तोल जाऊन तो वेगवान पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस आणि ग्रामस्थांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली होती. सलग दोन दिवस विविध ठिकाणी शोध घेतल्यानंतर रविवारी सकाळी सुमारे ११ वाजता शेवगे बुद्रुक गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावरील कंकराज धरणात समाधान भिल याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच हवालदार संदीप सातपुते, कैलास साळुंखे तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला.

मृतदेह बराच वेळ पाण्यात राहिल्याने तो कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन बाविस्कर यांनी घटनास्थळीच शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर आवश्यक पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. समाधान भिल यांच्या अकाली आणि दुर्दैवी निधनामुळे शेवगे बुद्रुक गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. पावसाळ्यात नदी-नाले आणि पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून मार्ग काढू नये, असे आवाहन प्रशासनाकडून पुन्हा एकदा करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound