Home Cities अमळनेर धावडे नदीपात्रातून सुरू असलेल्या वाळू चोरीमुळे ग्रामस्थ संतप्त; तहसीलदारांकडे कारवाईची मागणी

धावडे नदीपात्रातून सुरू असलेल्या वाळू चोरीमुळे ग्रामस्थ संतप्त; तहसीलदारांकडे कारवाईची मागणी


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील तापी नदीकाठावरील धावडे गावाजवळ नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या वाळूच्या चोरट्या वाहतुकीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या या बेकायदेशीर प्रकारामुळे नदीची खोली वाढत असून भविष्यात पाणीटंचाईचे गंभीर संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देत तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, तापी नदीकाठावरील सावखेडा, धावडे, मुंगसे, रुंधाटी आणि गंगापुरी या परिसरातील वाळू घाटांवरून बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. विशेषतः धावडे येथील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सावखेडा येथील वाळू घाटाचे कंत्राटदार बोटींच्या सहाय्याने धावडे परिसरातून बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करत असल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.

महत्त्वाचे म्हणजे, संबंधित कंत्राटदारांना निविदेमध्ये बोटींच्या सहाय्याने वाळू उपसा करण्याची परवानगी नसतानाही बेकायदेशीररीत्या बोटींचा वापर करून वाळू काढली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर डंपरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जात असल्याने परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.

सावखेडा ते अमळनेर या मार्गावरील रस्ता सततच्या अवजड डंपर वाहतुकीमुळे पूर्णतः खड्डेमय झाला असून नागरिकांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याने वाहनधारकांसह शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

दरम्यान, वाळू चोरीला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना आणि दक्षता समिती सदस्यांना वाळू माफियांकडून धमकीवजा इशारे दिले जात असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. काही ठिकाणी अंगावर डंपर घालण्याचे प्रकार घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात वाळू चोरीमुळे नदीतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. परिणामी भविष्यात धावडेसह परिसरातील गावांना पाणीटंचाईचा मोठा फटका बसू शकतो. धावडे येथून इतर गावांनाही पाणीपुरवठा होत असल्याने या समस्येचा परिणाम व्यापक स्वरूपात जाणवू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

या संपूर्ण प्रकरणी सरपंचांसह ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देऊन बेकायदेशीर वाळू उपसा आणि वाहतूक तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित कंत्राटदार आणि वाळू माफियांवर कठोर दंडात्मक कारवाई करून नदीपात्राचे संरक्षण करण्याची मागणीही करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound