रक्षाताई खडसेंचा विजय : जाणून घ्या १० महत्वाची कारणे !

rakshatai khadse

जळगाव प्रतिनिधी । महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे यांनी अपेक्षेनुसार रावेर मतदारसंघातून दणदणीत विजय संपादन केला आहे. त्यांच्या विजयामागील जाणून घ्या १० प्रमुख फॅक्टर्स.

देशभरात पंतप्रधान मोदी यांच्या विषयी असणार्‍या लाटेचा या विजयात महत्वाचा वाटा असला तरी रक्षाताई खडसे यांनी केलेली उज्ज्वल कामगिरीदेखील यासाठी कारणीभूत आहे. यासोबत अनेक काही महत्वाचे मुद्दे त्यांच्यासाठी लाभदायक ठरले.

१) जनसंपर्क : खासदार हा मतदारसंघात तोंडही दाखवत नसल्याची तक्रार अनेकदा करण्यात येते. यात सत्यांशदेखील आहे. कारण वर्षातील जवळपास १०० पेक्षा जास्त दिवस हे अधिवेशनांमध्येच जातात. तर अन्य शासकीय व पक्षीय कार्यक्रमांमधून खासदाराला फार थोडा वेळ मिळतो. मात्र असे असूनही रक्षाताई खडसे यांनी आपल्या पाच वर्षाच्या कालखंडात अगदी परफेक्ट टाईम मॅनेजमेंट करून मतदारसंघातील कान्याकोपर्‍यात जनसंपर्क ठेवला. पाच वर्षात त्यांनी मतदारसंघातील सुमारे ९० टक्के गावांना किमान एकदा तरी भेट दिली. यामुळे कायम संपर्कात असणार्‍या खासदार म्हणून मिळवलेला लौकीक त्यांना उपयोगात आला.

२) विकासकामे : मोदी सरकारच्या अनेक योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्याकडे रक्षाताई खडसे यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिले. तर रावेर लोकसभा मतदारसंघासाठी अनेक विकासकामे मंजूर केल्याचा त्यांना लाभ झाला. विशेष करून रेल्वेच्या अखत्यारीत असणार्‍या अनेक कामांना त्यांच्या पाठपुराव्यामुळे चालना मिळाली. मेगा रिचार्जसारख्या महत्वाकांक्षी योजनेचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून हा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांची बनलेली विकासाभिमुख प्रतिमा या निवडणुकीत उपयोगात आली.

३) संयमी आगेकुच : एकनाथराव खडसे यांना अत्यंत कटू घडामोडीनंतर राजीनामा द्यावा लागल्याने खडसे कुटुंबाच्या राजकीय वर्चस्वाला जबर धक्का बसला. यानंतर अगदी जिल्ह्यातही अनेक निर्णय प्रक्रियांमध्ये खडसेंना टाळण्यात आले. मात्र, रक्षाताईंनी अतिशय संयमाने आपली आगेकूच कायम ठेवली. त्यांच्या वागणुकीत कोणतीही कटुता दिसली नाही. नाथाभाऊ आणि ना. गिरीश महाजन यांच्यात उघड वैमनस्य जाणवत असतांनाही रक्षाताईंनी त्यांच्यासह त्यांच्या गटातील नेत्यांशीही सलोख्याचे संबंध राखल्याचा त्यांना लाभ झाला.

४) नाथाभाऊंचे नेटवर्क : माजी मंत्री एकनाथराव खडसे हे राज्य पातळीवरील मातब्बर नेते असून जळगाव जिल्ह्यातही त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघावर त्यांची पक्की पकड आहे. यामुळे या लोकसभा निवडणुकीत नाथाभाऊंचे गुडविल रक्षाताईंना उपयोगात पडल्याचे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले आहे. विशेष करून प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात त्यांची अनुपस्थिती रक्षाताईंनी जाणवू दिली नाही. याला असणारी खडसे कुटुंबातील एकोप्याची किनारदेखील विसरता येणार नाही.

५) महायुतीतील एकोपा : मध्यंतरी भाजप व शिवसेनेतील वाद अतिशय विकोपाला गेले होते. विशेष करून मुक्ताईनगरात शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी नाथाभाऊंना विधानसभेत तगडे आव्हान दिल्यानंतर तर ही कटुता खूपच वाढली होती. लोकसभा निवडणुकीआधी युती झाली तरी अनेक ठिकाणच्या शिवसेना पदाधिकार्‍यांनी रक्षाताईंचा प्रचार न करण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र नंतर हा विरोध मावळला. चंद्रकांत पाटील हे प्रचारात फिरकले नसले तरी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी रक्षाताईंसाठी प्रचार केला. रिपाइं (आठवले गट) तसेच अन्य मित्रपक्षांनीही महायुती धर्म निभावल्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला.

६) पक्षातील भाऊबंदकीचा साईड इफेक्ट नाही : एकनाथराव खडसे आणि ना. गिरीश महाजन यांच्या गटात धुम्मस असली तरी लोकसभा निवडणुकीत याचा कोणताही विपरीत परिणाम झाला नाही. खुद्द ना. गिरीश महाजन हे स्वत: त्यांच्यासाठी मैदानात उतरले. त्यांनी आपल्या तालुक्यातून विक्रमी मताधिक्य देण्याची ग्वाही दिली. अर्थात, हे शक्य झाले नसले तरी त्यांच्या जाहीर आव्हानामुळे पक्षात एक सकारत्मक संदेश गेला. ना. महाजन यांचाच कित्ता त्यांच्या समर्थकांनी गिरवला. वरणगावचे नगराध्यक्ष सुनील काळे, भुसावळचे माजी नगरसेवक तथा ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस अजय भोळे आदींसह त्यांच्या गटातील अन्य नेत्यांनी हिरीरीने प्रचार केला. याचा अर्थातच या बेरजेच्या राजकीय घडामोडींचा रक्षाताईंना लाभ झाला.

७) लोकप्रतिनिधींची ताकद : रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्व आमदार हे भाजप व शिवसेनेचे असून बहुतांश नगरपालिका, पंचायत समित्या, बाजार समित्या, ग्रामपंचायती आदींवरही महायुतीचे वर्चस्व आहे. यामुळे साहजीकच रक्षाताई खडसे यांना लाभ झाला.

८) अचूक नियोजन : एकीकडे राष्ट्रवादीचा उमेदवार कोण ? याबाबत बराच काळ काथ्याकुट करण्यात आल्याने यात खूप वेळ गेला. ऐन वेळेस राष्ट्रवादीने हा मतदारसंघ काँग्रेसला सोडला. यानंतर काँग्रेसने काही दिवस घेतल्यानंतरच उल्हास पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. या कालखंडात रक्षाताई खडसे यांनी प्रचारात आघाडीदेखील घेतली होती. याला भाजपच्या अचूक नियोजनाची जोड मिळाली. याचा रक्षाताईंना लाभ झाल्याचे दिसून आले.

९) निद्रीस्त विरोधक : रावेर मतदारसंघातील बर्‍याच तालुक्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी महाआघाडीची ताकद बर्‍यापैकी असली तरी ते पूर्णपणे डॉ. उल्हास पाटील यांच्या पाठीशी उभे राहिल्याचे दिसले नाही. अरूणभाई गुजराथी, संतोष चौधरी, शिरीष मधुकरराव चौधरी, संजय गरूड आदींसारखे मातब्बर हवे तितके सक्रीय दिसले नाही. तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांमुळे विरोधकांच्या हक्काच्या मतपेढीचे विभाजन झाले. याचा सरळ लाभ रक्षाताईंना झाला.

१० ) सामाजिक समीकरण : रावेर मतदारसंघात लेवा पाटीदार समाजाचे वर्चस्व आहे. रक्षाताई आणि डॉ. उल्हास पाटील यांना सामाजिक समीकरणाची समान संधी होती. तथापि, रक्षाताईंना गुर्जर समाजाची कन्या आणि लेवा पाटीदारांची सून असा दुहेरी लाभ मिळाला. दलीत आणि अल्पसंख्यांक समाज हा काँग्रेसची हक्काची मतपेढी मानली जातो. तथापि, नाथभाऊंसोबत अल्पसंख्य समाज मोठ्या प्रमाणात असून रिपाइं (आठवले गट) पक्षासह दलीत समाजातील मोठा वर्गदेखील त्यांच्या सोबत राहिली. मराठा समाजात भाजपविरोधी लहर असली तरी डॉ. उल्हास पाटील त्यांच्यात विश्‍वास निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. याचा सरळ लाभ रक्षाताई खडसे यांना झाल्याने त्यांचा विजय सहजपणे साकार झाला.

Add Comment

Protected Content