नाशिकच्या ब्रम्हगिरीवर भुसावळ रनर्सच्या विजयी पताका

भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दरवर्षी ‘रन बडीज’ या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे त्र्यंबकेश्वरनाशिक येथील ब्रम्हगिरी पर्वतावर मॅरेथॉन आयोजित केली जाते. यात भुसावळच्या ८० धावपटूंनी यशस्वी सहभाग नोंदविला. 

त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगास प्रदक्षिणा हा या मॅरेथॉनचा उद्देश असतो. यावर्षी देखील स्टोनरिज व्हॅली ब्रम्हगिरी परिक्रमा मॅरेथॉन ३ किमी, ५ किमी, १० किमी, १५ किमी, २२ किमी, ४४ किमी व ६६ किमी या ७ गटात संपन्न झाली. २२ किमीचे अंतर पूर्ण केल्यास एक परिक्रमा पूर्ण होते. या अध्यात्मिक संदर्भासोबतच अतिशय निसर्गरम्य वातावरण, उंच उंच पर्वतरांगा, त्यातून नागमोडी वाटेने कमालीचा उंच सखल धावण्याचा रस्ता, ढगांमधून पळत असल्याचा होत असलेला आभास व त्याचबरोबर अधूनमधून कोसळणारा पाऊस या सर्वांमुळे ‘काय तो डोंगर, काय ती झाडी..’ असाच अनुभव सर्व भुसावळचे धावपटू घेत होते.

भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या तब्बल ८० धावपटूंनी या मॅरेथॉनमध्ये यशस्वी सहभाग नोंदविला. त्यापैकी तब्बल ३० धावपटू प्रथमच  शहराबाहेर मॅरेथॉन साठी सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. ८० पैकी तब्बल ३० महिला धावपटू सहभागी असल्यामुळे भुसावळच्या महिला शक्तीचा पराक्रम संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवला. यावर कळस म्हणजे १५ किमी गटात डॉ. नीलिमा नेहेते तृतीय, पूनम भंगाळे द्वितीय तर २२ किमी गटात सीमा पाटील तृतीय ठरल्या. या महिला शक्तीमुळे संपूर्ण मॅरेथॉनचे वातावरण भुसावळमय झाल्याचा अनुभव राष्ट्रीय स्तरावरील धावपटूंनी घेतला. आयोजकांना हा ब्रम्हगिरी रन आहे की भुसावळ रन असेच वाटत होते. भुसावळ रनर्सचे ८० धावपटू असोसिएशनच्या ऑफिसियल टी-शर्ट मध्ये धावत होते. त्याचबरोबर भुसावळ रनर्सचे प्रमुख प्रा. प्रवीण फालक यांनी दोन वेळा परिक्रमा न थकता सहजपणे पूर्ण करून ४४ किमीचे अंतर धावून पूर्ण केले. या सर्वच बाबींचा विचार करता आयोजकांतर्फे भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स  असोसिएशनला विशेषत्वे गौरविण्यात आले.

भुसावळ रनर्सतर्फे प्रवीण पाटील व डॉ. चारुलता पाटील या भाऊ बहिणीच्या जोडीने संयुक्तपणे हा सन्मान स्वीकारला. त्यावेळी सर्व धावपटूतर्फे एकच जल्लोष करण्यात आला. ८० धावपटूमध्ये १२ दांपत्य एकत्र धावले. यामध्ये प्रवीण फालक व स्वाती फालक, प्रवीण पाटील व अनिता पाटील, प्रवीण वारके व सोनाली वारके, अजय पाटील व चारुलता अजय पाटील, विलास पाटील व सुवर्णा पाटील, राजेंद्र ठाकूर व ममता ठाकूर, हरकेश मुरई व अनुष्का मुरई,  संदीप वर्मा व पारुल वर्मा, डॉ निर्मल बलके व पूजा बलके, सुनील सोनगिरे व इंदिरा सोनगिरे ,महेंद्र पाटील व सरला पाटील, पंकज कुलकर्णी व पूनम कुलकर्णी या पती-पत्नीच्या जोडीचा समावेश आहे. याशिवाय डॉ. नीलिमा नेहेते व डॉ संकेत नेहते ही आई पुत्राची जोडी,  माया पवार- मानसी पवार आणि छाया राजपूत – मानसी चव्हाण या माता पुत्रीच्या दोन जोड्या, श्रीकांत जोशी व तन्मय जोशी ही पिता पुत्राची जोडी तसेच कौस्तुभ मंत्री व प्रियंका मंत्री हे भाऊ-बहीण देखील सोबत धावले.

८० पैकी ४४ किमीमध्ये १ धावपटू, २२ किमीमध्ये १६ धावपटू, १५ किमीमध्ये ३२ धावपटू, १० किमीमध्ये २३ धावपटू व ५ किमीमध्ये ८ धावपटूंनी यशस्वी सहभाग नोंदविला. सर्व यशस्वी धावपटूंचे भुसावळ शहरातील नागरिकांद्वारे अभिनंदन करण्यात आले.

Protected Content