विद्यार्थ्यांनी बनवले टाकाऊ भाजीपाल्यापासून बहुउपयोगी अमायलेझ एंझाइम

de4ba0d6 88bc 4bd0 8947 6fb68b63d54c

जळगाव (प्रतिनिधी) येथील श्रम साधना ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयातील जैवतंत्रद्यान अभियांत्रिकी (बायोटेक्नॉलॉजी) शाखेच्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या गणेश चौधरी, हेमवंता पाटील व शुभम खोसे या विद्यार्थ्यांनी विविध आठवडे बाजार व भाजीपाला बाजारांमध्ये फेकून देण्यात येणाऱ्या व पर्यायाने घाणीचे साम्राज्य वाढवणाऱ्या समस्येवर तोडगा म्हणून अंतिम वर्षाच्या प्रकल्पासाठी ‘टाकाऊ भाजीपाल्यापासून अमायलेझ एंझाइमबनवणे’ हा विषय निवडला होता. या प्रकल्पाला ‘शोधप्रकल्प प्रतियोगिता-२०१९’ या विद्यापीठ स्तरीय शोधप्रकल्प प्रदर्शनात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.

 

या प्रकल्पासाठी महाविद्यालयापासून जवळच असलेल्या भाजीपाला बाजारातून टाकून दिलेल्या भाजीपाल्याच्या कचऱ्याचे संकलन करण्यात आले. हा संकलित केलेला टाकाऊ भाजीपाला अगोदर व्यवस्थित धुऊन घेण्यात आला. या स्वच्छ धुतलेल्या भाजीपाल्याला एकत्र करून त्याचा रस काढण्यात आला. या प्रकल्पासाठी बॅसिलस पॉलिमिक्झा या सूक्ष्मजीवांचा उपयोग भाजीपाल्याच्या रसावर प्रक्रिया करण्यासाठी करण्यात आला. या प्रक्रियेत भाजीपाल्याच्या रसासोबतच सुक्षजिवांच्या वाढीसाठी व अधिक एंझाइम उत्पादनासाठी स्टार्चचाही उपयोग करण्यात आला. या सर्व मिश्रणाचे फर्मेंटेशन करून आमायलेझ एंझाइम तयार करण्यात आले.

हे एंझाइम बहुउपयोगी असून याचा वापर मोठ्या प्रमाणात कापड उद्योगामध्ये ब्लिचिंग प्रक्रियेसाठी, बायोपॉलीशर म्हणून, धाग्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी, धाग्यांचा मऊपणा वाढविण्यासाठी, कपड्यांवरील डाग काढण्यासाठी कपडे धुण्याच्या पावडरमध्ये, अल्कोहोल उद्योगांमध्ये स्टार्चचे हायड्रोलिसिस करणेकामी, खाद्यपदार्थ उद्योगांमध्ये केक, फ्रुट ज्यूस, सिरप, बेकरी उत्पादने इत्यादींमध्ये तसेच कागद उद्योगांमध्ये कागदाची गुणवत्ता वाढवण्यासाठी केला जातो. या प्रकल्पाला ‘शोधप्रकल्प प्रतियोगिता-२०१९’ या विद्यापीठ स्तरीय शोधप्रकल्प प्रदर्शनात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. या प्रकल्पासाठी विद्यार्थ्यांना विभागप्रमुख डॉ.व्ही.आर. डिवरे, प्रा.जयंत पी. पारपल्लीवार व प्रा.गौरव दिलीप खोडपे यांचे मार्गदर्शन लाभले.

Add Comment

Protected Content