जामनेर येथे राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा; मोबाईल अँपद्वारे करणार जनजागृती

248a9158 2e71 4403 a6b8 70ec1dcc9775

जामनेर (प्रतिनिधी) केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आज (दि.१६) येथे राष्ट्रीय डेंग्यू दिन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एस. कमलापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यासह तालुक्यात सर्वत्र साजरा करण्यात आला.डेंग्यू आजाराविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या अंमलबजावणीसाठी त्यांचा सक्रिय सहभाग प्राप्त करून घेण्याच्या दृष्टीने प्रत्येकवर्षी विविध उपक्रमाद्वारे नागरिकांपर्यंत माहिती पोहोचण्याचा प्रयत्न करणे, याकरिता दरवर्षी १६ मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात येतो. त्यानंतर आठवडाभर किटकजन्य सर्वेक्षण करण्यात येते.

 

यंदा राष्ट्रीय डेंग्यू दिन प्रभावीपणे राबवण्यासाठी इंडिया फाइट्स डेंग्यू या मोबाईल अँप वापर केला जात आहे, यामध्ये डेंग्यूविषयी सर्व माहिती उपलब्ध आहे. याचा प्रचार सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत केला जात आहे. तालुका, प्रा. आ. केंद्र, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच गाव पातळीवर लोकप्रतिनिधी, महिला मंडळ, बचत गट, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी संस्था यांच्या सहभागातून प्रभात फेरी रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. तालुक्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून, जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक विद्यालय, कॉलेज, बँका, यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या सहकार्याने कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. या सर्व स्तरातून डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात येत आहे. बसस्थानक बाजार व गर्दीच्या अन्य ठिकाणी डेंग्यूची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत माहिती दिली जाणार आहे.

डेंग्यूचे प्रकार :- डेंग्यूचे तीन प्रकार आहेत, सौम्य डेंग्यू, रक्तस्रावी डेंग्यू व शॉकसह रक्तस्रावी डेंग्यू.

लक्षणे :- अचानक ताप येणे, तीव्र स्वरुपाची डोकेदुखी, मळमळ, उलट्या, अंगावर लाल चट्टे येणे, भूक कमी होणे, अशक्तपणा, डोळ्यांना वेदना होणे.

प्रतिबंधात्मक उपाय योजना :- घरातील पाण्याचे साठे दर आठवड्यातून एकदा पूर्ण रिकामे करणे व घासून-पुसून स्वच्छ करून कोरडे झाल्यानंतर पाण्याने भरणे. गटारी, परिसर स्वच्छ राखणे. निरुपयोगी टायर, नारळाच्या करवंट्या, मोकळे डबे या निरुपयोगी वस्तूंची विल्हेवाट लावणे. किटकभारित मच्छरदाणीचा वापर करणे. पाण्याची साठे रिकामे करणे, शक्य नसल्यास प्रमाणानुसार अळीनाशक अँबेट टाकणे. डेंग्यू ताप उद्रेक ग्रस्त भागात गावात धूर फवारणी करणे. घरांच्या दारे व खिडक्यांना बारीक जाळी बसविणे. संपूर्ण अंग झाकेल असे कपडे वापरणे. लहान बालकांना दिवसा मच्छरदाणीत झोपवणे.

“सध्या सर्वत्र पाणी टंचाई असल्यामुळे पाणी साठवून ठेवण्याचे प्रमाण जास्त आहे, साठवलेल्या पाण्यामध्ये डास अंडी घालतात, त्यामुळे आठवड्यातून एकदा सर्व भांडी कोरडी करून कोरडा दिवस पाळणे, जेणेकरून डासोत्पप्ती होणार नाही. डासांपासून बचाव हाच डेंग्यूची लागण रोखण्याचा उपाय आहे. ”
वरील सर्व उपाययोजना अमलात आणून जनतेने आरोग्य विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे, डॉ. पल्लवी सोनवणे व तालुका हिवताप पर्यवेक्षक विजय वानखेडे व तालुका आरोग्य सहाय्यक बशीर पिंजारी यांनी केले आहे.

मोफत रोटा व्हायरस लस :- लवकरच रोटा व्हायरस लस मोफत मिळणार आहे. खाजगी दवाखान्यात २००० रुपयांना मिळणारी रोटा व्हायरस लस बाळाच्या वयाच्या सहाव्या, १० व्या व १४ व्या आठवड्यात आरोग्य विभागामार्फत लवकरच मोफत देण्यात येणार आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी यावेळी दिली. तालुक्यातील सर्व आरोग्यसेविका व आरोग्यसेवक, गटप्रवर्तक, आरोग्य सहाय्यिका, आरोग्य सहाय्यक यांचे डॉ. पल्लवी सोनवणे,डॉ. मनोज पाटील, डॉ.गौतम खिल्लारे, आशा कुयटे यांना रोटा व्हायरसबाबत प्रशिक्षण देण्यात आले. आरोग्य विस्तार अधिकारी बी.सी.बाविस्कर यांनी टँकर चालु असलेल्या गावविषयी व जिओ फेंसिंग, साथरोगाबाबत आढावा घेतला. याप्रसंगी हिवताप व डेंग्यू व अन्य किटकजन्य आजार याविषयी प्रतिज्ञा घेण्यात आली.

Add Comment

Protected Content