पुणे जिल्हयातील वेल्हे तालूक्याचे नाव आता ‘राजगड’

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याला राजगड असे नवीन नाव प्राप्त झाले आहे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. वेल्हे तालूक्यात राजगड, तोरणासारखे ऐतिहासिक किल्ले आहेत. राजगड हा महत्वाचा किल्ला आहे. या किल्ल्यांवरूनच शिवाजी महाराजांनी २७ वर्ष स्वराज्याचा कारभार केला होता, स्वराज्याची पहिली राजधानी राजगडच होती.

वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्यासाठी तालुक्यातील ७० पैकी ५८ ग्रामपंचायतींचे सकारात्मक ठराव प्राप्त करुन घेणे, पुणे जिल्हा परिषदेच्या २२ नोव्हेंबर २०२१ च्या सर्वसाधारण सभेत राजगड नावाची शिफारस मंजूर करुन घेणे, पुणे विभागीय आयुक्तांकडून ५ मे २०२२ ला तसा प्रस्ताव सादर करुन घेण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी महत्वाची भूमिका बजावली होती.आता वेल्हे तालूक्याला राजगड हे नाव मिळाले आहे. वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गेली काही वर्षे सातत्याने चालविलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते असताना 27 एप्रिल 2023 ला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून वेल्हे तालुक्याचे नाव राजगड करण्याची कार्यवाही तात्काळ करण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांनी वेळोवेळी केलेली मागणी आज त्यांच्याच उपमुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत पूर्ण होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हा निर्णय घेण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्व ग्रामपंचायतींचे, जिल्हा परिषद सदस्यांचे अभिनंदन करुन आभार मानले आहेत.

Protected Content