१८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात विविध ठराव पारित

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील विद्रोही मराठी साहित्य संमेलनात साहित्य, बोलीभाषा, संस्कृती, सामाजिक, कृषी, शैक्षणिक, पत्रकारिता या विषयावर ठराव मांडण्यात आले.

१८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनातील पारित ठराव

ठराव १
अमळनेरसह खानदेशातील लाखो शेतकऱ्यांसाठी संजीवनी असलेले तापी नदीवरील २४ वर्षांपासून रखडलेले निम्नतापी प्रकल्प, पाडळसरे धरण तातडीने पूर्ण व्हावे यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत प्राधान्याने समावेश करावा.

ठराव २
साने गुरुजींची कर्मभूमी असलेल्या अमळनेर शहरातील स्मारकाला शासनाने तातडीने निधी देऊन गुरुजींचे विचार जनमानसात पोहोचवण्यासाठी आपले योगदान द्यावे.

ठराव ३
महाराष्ट्रासह देशात त्वरित जातनिहाय जनगणना करून नैसर्गिक स्त्रोतांसह सत्ता, संपत्ती मध्ये संख्येप्रमाणे वाटा देऊन संविधानातील नागरिकत्वाचे अधिकार व प्रतिष्ठा अल्पसंख्यांक व शोषित समाजासह सर्व भारतीयांना देण्यात यावे असा ठराव अठराव्या विद्रोही साहित्य संमेलन करीत आहे.

ठराव ४
धरणगाव परिसरात ब्रिटिशसाम्राज्यशाही विरुद्ध लढणाऱ्या क्रांतिवीर ख्वाजेसिंग नाईक यांचे यथोचित स्मारक उभारण्यात यावे. व त्या ठिकाणी असलेले हेडगेवार नगर नाव बदलून क्रांतिवीर ख्वाजेसिंग नाईक नगर नाव देण्यात यावे.

ठराव ५
जल, जंगल, जमिनीच्या प्रश्नासाठी नंदुरबार ते मुंबई असा पायी बिडार मोर्चा सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांनी काढला या मोर्चात जवळपास दहा ते बारा हजार स्त्री – पुरुष सहभागी झालेत व शासनाने सदर मोर्चाची दखल घेऊन मागण्या मान्य केल्या परंतु शासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता त्वरित करून वन जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना हक्काचा सातबारा उतारा त्वरित द्यावा. असा ठराव आजच्या आठव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलन करीत आहे.

ठराव ६
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह सर्व विद्यापीठांमध्ये आदिवासी भटके विमुक्त संस्कृती भाषा अध्ययन केंद्राचा व मानव वंशाचा अध्ययन विभाग सुरू करण्यात यावा असा ठराव विद्रोही साहित्य संमेलन करीत आहे

ठराव ७
अहिराणी, पावरी, मावची, गोंडी, बिलवरी, इत्यादी सर्व बोलीभाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा व त्यांच्या जतन व संवर्धनाचा निधी उपलब्ध करावा. असा ठराव आजच्या विद्रोही साहित्य संमेलनात करीत आहेत.

ठराव ८
मराठीसह सर्व भाषिक वाहिन्या व वृत्तपत्रांवर बंदी, ईडी चौकशी, धमक्या, हल्ले करत माध्यमांची गळचेपी करणाऱ्या शासन पुरस्कृत वृत्तीचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या निष्ठावान, संविधानवादी पत्रकारितेच्या बाजूने उभे राहण्याचा ठाम निर्धार करणारा ठराव आजच्या विद्रोही साहित्य संमेलनात करीत आहोत

ठराव ९
शिक्षणाचे ब्राह्मणीकरण, व्यावसायिकीकरण व पुरुषसत्ताक वर्चस्ववादी भूमिकेतून मांडणी करणारे नवे शैक्षणिक धोरण हे कष्टकऱ्यांना शिक्षणातून हद्दपार करणारे असल्याने ते रद्द करून महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतावादी शिक्षण दृष्टीची अंमलबजावणी करणारे धोरण आखण्यात यावे असा ठराव आजच्या विद्रोही मराठी साहित्य संमेलन करीत आहे

ठराव १०
अमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र देशातील पुरातन तत्त्वज्ञान केंद्र आहे. सर्वधर्म, संप्रदायाचे तत्वभान देणाऱ्या केंद्राच्या परिसरात मंदिर बांधून तत्त्वज्ञान केंद्राच्या उद्देशाला संघीय विचारधारेच्या लोकांनी हरताळ फासला आहे. सदर तत्त्वज्ञान केंद्र कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मालकीचे असून विद्यापीठाची कोणतीही परवानगी न घेता मंदिराचे बांधकाम केले आहे. त्याची चौकशी होऊन आंतरराष्ट्रीय पातळीवरील तत्त्वज्ञानाच्या केंद्रात बेकायदेशीर धार्मिक कर्मकांड सुरू करू पाहणाऱ्या धर्मांध शक्तींना तात्काळ अटक करण्यात यावी. सदर झुंडशाहीच्या धार्मिक ध्रुवीकरणाचा हे संमेलन निषेध करीत आहे.

ठराव ११
आदिवासी स्त्री पुरुष समानतेचा नवा कायदा आदिवासी परंपरा व संस्कृती लक्षात घेऊन करण्यात यावा असा ठराव अठराव्या विद्रोही साहित्य संमेलन करीत आहे

ठराव १२
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बोधचिन्हातून पेशव्यांचा शनिवार वाडा काढून त्या जागी जिजाऊ शिवबांचा लाल महाल समाविष्ट करावा असा ठराव साहित्य संमेलन करीत आहे.

ठराव १३
२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिन भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा ठराव अठराव्या विद्रोही साहित्य संमेलन करीत आहे.

ठराव १४
28 नोव्हेंबर महात्मा फुले स्मृतिदिन हाच खरा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा ठराव १८ वे विद्रोही साहित्य संमेलन करीत आहे.

ठराव १५
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे इंदू मिल परिसरातील स्मारक तात्काळ पूर्ण करून जनतेसाठी खुले करण्यात यावे असा ठराव विद्रोही साहित्य संमेलन करीत आहे

ठराव १६
शेतकरी विरोधी तीन काळे कायदे केंद्र सरकारने मागे घेतले परंतु अन्यायकारक वीज कायदा मागे घेतला नाही तो त्वरित मागे घेण्यात यावा शेतकरी आंदोलन काळात हुतात्मा शेतकऱ्यांच्या कुटुंबांना घोषित मदत त्वरित द्यावी असा ठराव विद्रोही मराठी साहित्य संमेलन करीत आहे.

ठराव १७
साक्षी मलिक आणि तिच्या सहकाऱ्यावर झालेल्या अत्याचारावरून क्रीडामंत्र्यासह सर्व संबंधितांनी राजीनामा द्यावा तसेच आरोपांची चौकशी करून ब्रिज भूषण सिंह व सर्व आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असा ठराव अठराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलन करीत आहे.

ठराव १८
क्रांतिवीरांगणा लीलाताई उत्तमराव पाटील यांचे १९४२ च्या पत्री सरकारमधील ब्रिटिश विरोधी कार्य लक्षात घेऊन त्यांचे क्रांती स्मारक जळगाव जिल्ह्यात करण्यात यावे असा ठराव विद्रोही मराठी साहित्य संमेलन करीत आहे.

ठराव १९
भारतीय संविधानावरील हल्ले करून जाती-धर्म सत्तेचे प्राबल्य माजवणाऱ्या व ब्राह्मणी राष्ट्रात भारताचे रूपांतर करू पाहणाऱ्या वृत्तीचा निषेध व भारतीय संविधान रक्षणाचा निर्धार करण्याचा ठराव 18 विद्रोही साहित्य संमेलन करीत आहे.

ठराव २०
शेतीमालाला रास्तभाव देणारा एम एस पी गॅरंटी कायदा करण्यात येऊन शेतकरी आत्महत्या थांबवा व शेती प्रश्न, पाणी, जमीन, शेतकऱ्यांची स्थिती याबद्दल श्वेतपत्रिका काढावी. असा ठराव काय विद्रोही साहित्य संमेलन करीत आहे

ठराव २१
देशात संविधान लागू होऊन ७५ वर्षे झाली आहेत त्यातील शिक्षण, शेती, आरोग्य, आरक्षण, रोजगार या मूलभूत प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवण्यात यावे असा ठराव १८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलन करीत आहे.

ठराव २२
प्रस्स्थापित साहित्यिकांच्या रूट बटाईसाठी दिला जाणारा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा २ कोटी रुपये निधी बंद करून ते पैसे मराठी शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, खेळ इत्यादींच्या विकासासाठी खर्च करावा. असा ठराव करत आहे.

ठराव क्रमांक 23
अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षण ,आरक्षण व संरक्षणाच्या प्रश्नावर शासनाने त्वरित कृती कार्यक्रम जाहीर करावा असा ठराव आज १८ व्या विद्रोही साहित्य संमेलनात करण्यात आले.

Protected Content