यावल खरेदी-विक्री संघात महायुती सुसाट : मविआ भुईसपाट !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल खरेदी-विक्री संघ अर्थात शेतकी संघाच्या काल झालेल्या निवडणुकीत भाजप प्रणीत पॅनलने दणदणीत यश संपादन करत बहुमत प्राप्त केले आहे. या पॅनलने १७ पैकी १६ जागा पटकावल्या असून मविआ प्रणीत पॅनलचा दारूण पराभव झाला आहे. त्यांना फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले.

यावल तालुका शेतकी संघाच्या निवडणुकीत महायुतीचा एक उमेदवार हा आधीच बिनविरोध निवडून आला होता. उर्वरित १६ जागांसाठी काल म्हणजे रविवार दिनांक ४ रोजी मतदान घेण्यात आले होते. यात महाविकास आघाडी प्रणीत शेतकरी विकास आणि महायुतीचे सहकार या दोन्ही पॅनलचे एकुण ३२ इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली होती. यासाठी दिनांक ४ फेब्रुवारी रोजी माध्यमिक कन्या शाळेत व्यक्तीशः मतदारसंघात ६६टक्के मतदान झाले होते. दोन हजार ८२५पैक्की१८६९ मतदारांनी मतदान केले होते.

दरम्यान आज महर्षी श्री व्यास महाराज यांच्या मंदीराच्या सभागृहात मतमोजणीस सुरूवात झाली. यात महायुतीने पहिल्यापासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. यामुळे येथील मविआ प्रणीत पॅनलची सत्ता जाऊन महायुतीचे पॅनल सत्तारूढ झाले आहे. लक्षणीय बाब म्हणजे सहकारी पॅनलच्या १५ आणि आधी एक बिनविरोध झाल्याने एकूण १६ जागा निवडून आल्या असून विरोधकांमध्ये फक्त माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांना विजय मिळविता आले. अन्य सर्व उमेदवारांचा दारूण पराभव झाला.

आजच्या निकालात विजयी झालेले उमेदवार हे पुढील प्रमाणे आहेत- नरेंद्र विष्णू नारखेडे, उमेश रेवा फेगडे, हेमराज जगन्नाथ फेगडे, धनंजय यशवंत फिरके, तेजस धनंजय पाटील, नारायण शशिकांत चौधरी, अतुल भागवत भालेराव, पांडुरंग दगडू सराफ, प्रवीण भास्कर वारके, नरेंद्र वामन कोल्हे, प्रशांत लिलाधर चौधरी, सुनील बाळकृष्ण नेवे, सागर राजेंद्र महाजन, आरती शरद महाजन, नयना चंद्रशेखर चौधरी आणि अतुल वसंत पाटील. यातील अतुल पाटील यांचा अपवाद वगळता सर्व विजयी उमेदवार हे महायुतीच्या पॅनलचे आहेत. आजच्या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे भाजपने सर्व जागांवर विजय मिळविला असला तरी मविआच्या पॅनलचे उमेदवार तथा माजी नगराध्यक्ष अतुल वसंत पाटील यांनी अवघ्या दोन मतांनी विजय मिळविला.

महाविकास आघाडीच्या पॅनलसाठी माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे, आ. शिरीषदादा चौधरी, राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे अतुल पाटील आदी मान्यवरांनी केलेले प्रयत्न फोल ठरले. तर दुसरीकडे भाजप जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सहकार पॅनलने सर्व जागा जिंकून मविआला जबरदस्त धक्का दिला आहे.

Protected Content