सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासन आणि सहसंचालक उच्च शिक्षण जळगाव विभाग यांच्या परिपत्रकानुसार फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभागाने भारतीय राज्यघटनेच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त ‘संविधान गौरव महोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन केले. या महोत्सवात ‘भारतीय संविधानाची ओळख’ या विषयावर निबंध स्पर्धा, पोस्टर भिंतीपत्रक स्पर्धा, प्रश्नमंजुषा आणि व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात तापी परिसर विद्यामंडळाचे पदाधिकारी डॉ. एस. के. चौधरी (उपाध्यक्ष), लीलाधर विश्वनाथ चौधरी (चेअरमन), प्रा.के.आर. चौधरी (व्हाईस चेअरमन), प्रा.एम.टी. फिरके (सचिव), प्रा.नंदकुमार भंगाळे (सहसचिव), डॉ.एस.एस. पाटील (सदस्य), संजय चौधरी (सदस्य) यांच्या उपस्थितीत पोस्टर भिंतीपत्रकांच्या प्रदर्शनाने झाली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘भारतीय राज्यघटनेची ओळख’ या विषयावर प्रा. डॉ. जगदीश खरात यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. एस. पी. जाधव होते. अतिथी म्हणून डॉ. कल्पना पाटील, डॉ. हरीश नेमाडे आणि कार्यक्रमाचे समन्वयक राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. ताराचंद सावसाकडे व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. जगदीश खरात यांनी आपल्या व्याख्यानात विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटनेची सविस्तर ओळख करून दिली. त्यांनी संविधानिक मूल्ये आणि संविधानातील मूलभूत अधिकारांची माहिती दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामान्य माणसाला, शोषित, वंचित, पीडित वर्गाला राज्यघटनेच्या माध्यमातून उभे करण्याचा प्रयत्न केला. चहा विकणारा माणूसही देशाचा पंतप्रधान बनू शकतो, हे संविधानामुळेच शक्य झाले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर, भारतीय राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण होऊनही जातीय निर्मूलन होऊ शकले नाही, याबद्दल खंत व्यक्त केली. नागरिकांनी कोणत्याही भावनेच्या आहारी न जाता घटनेने दिलेल्या मूलभूत हक्क आणि कर्तव्यांचे पालन आणि जतन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. एस. व्ही. जाधव यांनी विद्यार्थ्यांनी संविधानिक मूल्ये जीवनात पुस्तकी स्वरूपात न घेता, स्वतःच्या आयुष्यात उतरवली पाहिजेत, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. ताराचंद सावसाकडे यांनी केले. भारतीय राज्यघटनेमुळेच भारतीय लोकशाही जगात सर्वात मोठी आणि श्रेष्ठ लोकशाही ठरत आहे. शेजारील राष्ट्रांच्या राजकीय व्यवस्थेला खीळ बसलेली दिसते, पण आपली लोकशाही व्यवस्था संविधानामुळेच मजबूत आहे. संविधानामुळेच सामान्य माणसाला लोकशाहीमध्ये महत्त्वपूर्ण स्थान मिळाले आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. संविधान गौरव महोत्सवानिमित्त संजना चंद्रकांत भालेराव आणि निखिल रविंद्र इंगळे यांनी संविधानावर आधारित गीत गायन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर. आर. राजपूत यांनी केले, तर आभार प्रा. मंजुश्री पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. पल्लवी तायडे आणि रेहान तडवी यांनी अथक परिश्रम घेतले. निबंध स्पर्धेत घाया किशोर शिरसाळे, पोस्टर भिंतीपत्रक स्पर्धेत वैश्नवी महेंद्र पाटील आणि सानिका संजय मेढे, प्रश्नमंजुषा स्पर्धेत निखिल रविंद्र इंगळे आणि अजय राहुल तायडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.