रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी पंकज राजीव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून बाजार समितीच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात या निवडीची चर्चा सुरू आहे. संचालक मंडळाच्या विशेष सभेत त्यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने अध्यासी अधिकाऱ्यांनी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली. निवडीनंतर बाजार समिती परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
मावळते उपसभापती पांडुरंग पाटील यांनी पूर्वनियोजित ठरावानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसभापतीपद रिक्त झाले होते. त्यानंतर या रिक्त पदासाठी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. बाजार समितीच्या सभागृहात सहाय्यक निबंधक डी. व्ही. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची विशेष सभा घेण्यात आली होती. या सभेत उपसभापतीपदासाठी पंकज पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.

निवड प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी बाजार समितीचे सचिव कमलेश पाटील तसेच उपसचिव श्री. तायडे यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. निवड जाहीर होताच बाजार समितीचे सभापती प्रल्हाद पाटील आणि संचालक मंडळातील सदस्यांनी पंकज पाटील यांचे पुष्पहार घालून स्वागत केले व शुभेच्छांचा वर्षाव केला.
यावेळी सभापती प्रल्हाद पाटील, संचालक डॉ. राजेंद्र पाटील, योगीराज पाटील, मंदार पाटील, राजेंद्र चौधरी, पितांबर पाटील, सचिन पाटील, जयेश कुयटे, गणेश महाजन, योगेश पाटील, पांडुरंग पाटील, सिकंदर तडवी, रोहित अग्रवाल, विलास चौधरी, सैय्यद असगर सै. तुकडू तसेच संचालिका मनिषा पाटील आणि सविता पाटील यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. उपस्थितांनी नव्या उपसभापतींकडून बाजार समितीच्या विकासासाठी सकारात्मक कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली.



