रावेर, प्रतिनिधी | तालुक्यात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने प्राथमिक , माध्यमिक शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
शिक्षण विभाग पंचायत समिती रावेर मार्फत गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या १४९ शाळांमध्ये माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती व वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रंथदिंडी , पुस्तक पूजन , वाचन कोपरा, बाल ग्रंथालय, प्रकट वाचन अशा विविध उपक्रमात जिल्हा परिषदेच्या सुमारे पंधरा हजार विद्यार्थी व पाचशे सत्तर शिक्षकांनी सहभाग घेतला. केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापक यांनी नियोजन केले. जि. प. शाळा निंबोल येथे ग्रंथ दिंडी च्या शुभारंभप्रसंगी गटशिक्षणाधिकारी यांनी वाचनाचे महत्व स्पष्ट केले. केंद्र प्रमुख विलास कोळी, मुख्याध्यापिका सुनंदा विसपुते, कल्पना पाटील , जिजाबराव पाटील, विनायक तायडे यांच्यासह गावातील भजनी मंडळ व विद्यार्थी उपस्थित होते.