वरणगाव फायर स्टेशनच्या दरवाजांच्या चोरी; पालिका प्रशासनाची भूमिका संशयास्पद

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील वरणगाव येथील पालिकेच्या फायर स्टेशनमधील दरवाजे चोरी प्रकरणी अखेर नऊ जणांना अटक करण्यात आली असली तरी यात पालिका प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे.

याबाबत वृत्त असे की, येथील रावजी बुवा कठोरा रोडवरील वरणगाव पालिकेच्या फायर स्टेशन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले होते. या इमारतीचे २४ दरवाजे चोरट्यांनी लांबवल्याची घटना जुलैच्या पहिल्या आठवड्यात घडली होती. या इमारतीला २४ लाकडी दरवाजे लावले होते. त्याची किंमत सुमारे ७५ हजार रुपये आहे. तसेच सिद्धेश्‍वर नगरात पालिकेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आहे. येथील १ लाख रुपये किमतीचा १० एचपीचा पंप देखील चोरट्यांनी लांबवला असल्याचे उघडकीस आले होते. या अनुषंगाने एकूण १ लाख ७५ हजार रुपयांचे साहित्य लांबल्याप्रकरणी पालिकेचे लेखापाल दौलत गुट्टे यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.

यानंतर एपीआय संदीपकुमार बोरसे यांच्यासह हर्षल भोये, फौजदार सुनील वाणी, गणेश शेळके यांनी तपासाची चक्रे फिरवली. त्यात पवन माळी (वय २१), विपुल बर्‍हाटे (वय २०), प्रशांत चौधरी (२०), जितेंद्र जितेंद्र भंगाळे (५१), चेतन पाटील (३२), अमोल चौधरी (२७), शिवम पाटील (२१), मयूर चौधरी (२५), राहुल इंगळे (२५, सर्व रा.वरणगाव) या ९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील १६ दरवाजे संशयितांनी आणून दिले आहेत. तथापि, यात पालिका प्रशासनाबाबत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी झाल्यास अजून काही बाबी उजेडात येण्याची शक्यता आहे. यामुळे याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Protected Content