राजकीय पक्षाच्या कॉलसेंटर कार्यालयातील सामानांची तोडफोड !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जोशीपेठ परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये सुरु असलेल्या एका राजकीय पक्षाच्या कॉलसेंटरवर एका टोक्याने हल्ला करीत कार्यालयातील सामानांची तोडफोड केल्याची घटना रविवारी २८ एप्रिल रोजी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, शनिपेठ पोलिसांच्या पथकाने काही वेळातच तोडफोड करणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

सध्यासर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून उमेदवारांकडून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या मोबाईलवरुन मतदारांशी संपर्क केला जात आहे. त्यासाठी एका राजकीय पक्षातर्फे मतदारांशी संपर्क साधण्यासाठी एडीएस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कंत्राट दिला आहे. या कंपनीने शहरातील जोशी पेठेतील अवधूत व्यायाम शाळेसमोरील सोना श्री साई प्लाझा येथे कॉल सेंटर सुरु केलेअसून तेथून ते मतदारांसोबत संपर्क साधत आहे. दरम्यान, रविवारी २८ एप्रिल रोजी ७.३० वाजेच्या सुमारास चार ते पाच अनोळखी टोळका एडीएस कंपनीच्या कार्यालयात आले. त्यांनी कॉलसेंटरमध्ये अनधिकृतपणे प्रवेश करीत तेथील साहित्याची तोडफोड केली. यामध्ये कॉम्प्युटर, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह फॅनची तोडफोड करीत नुकसान केले. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरुन तोडफोड करणाऱ्या टोळक्याला पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

कॉल सेंटरची तोडफोड केल्याची माहिती मिळताच राजकीय पदाधिकाऱ्यांनी देखील त्याठिकाणी धाव घेतली होती. त्यांनी हे कॉलसेंटर आमच्या पक्षाची संबंधित नसल्याचे सांगत तेथून धूम ठोकली. त्यामुळे हे कॉल सेंटर अनधिकृत असल्याची चर्चा देखील याठिकाणी सुरु होती.

Protected Content