अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अनुसूचित जाती संवर्गाच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवत अमळनेर तालुक्यातील विविध समाजघटक एकवटले आहेत. साने गुरुजी विद्यालयात १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी झालेल्या सहविचार सभेत उपवर्गीकरणाविरोधात एकजुटीने लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच तालुक्यात भव्य मोर्चा काढण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
आगामी महिन्यात जिल्हास्तरावर उपवर्गीकरण विरोधी मोर्चाचे आयोजन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यापूर्वी अमळनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोर्चा काढून आंदोलनाची भूमिका स्पष्ट करण्याचे बैठकीत ठरविण्यात आले. यासाठी तालुक्यातील अनुसूचित जाती संवर्गातील विविध समाजघटकांना एकत्र आणण्याचे आवाहन करण्यात आले. चर्मकार महासंघाचे ज्येष्ठ नेते भानुदास विसावे यांनी सभेला मार्गदर्शन करताना भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सर्व समाजघटकांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर समाजामध्ये एकजूट निर्माण करून संघटितपणे लढा उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.

या सहविचार सभेला बौद्ध, चांभार, होलार, मातंग आणि मेहतर समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपवर्गीकरणाविरोधातील लढ्यात खांद्याला खांदा लावून सहभागी होण्याचा निर्धार उपस्थित समाजबांधवांनी व्यक्त केला. आगामी मोर्चा यशस्वी करण्यासाठी गावागावात जनजागृती आणि नियोजन करण्यावरही चर्चा झाली. उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने अमळनेर तालुक्यातील अनुसूचित जाती संवर्गातील सर्व समाजघटकांनी मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातूनही या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या बैठकीस चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे, नरेश कांबळे, विजय बिऱ्हाडे, आरपीआयचे यशवंत बैसाने, ॲड. प्रशांत संदानशिव, सनी गायकवाड, अरुण मोरे, सोमचंद संदानशिव, हृदयनाथ मोरे, अतुल डोळस, बापूराव संदानशिव, योगराज संदानशिव, अर्जुन संदानशिव, अरुण घोलप, गौतम मोरे, अशोक बिऱ्हाडे, सुभाष आगळे, भगवान संदानशिव, अनिकेत ब्रम्हे, अशोक सैंदाने, दगडू सोनवणे, राहुल वाडेकर, मच्छिंद्र साळुंखे, राजेंद्र सैंदाने, गौतम शिरसाठ, उत्तर वानखेडे यांच्यासह ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.



