Home Cities अमळनेर शासकीय कामातील कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांचा राजपूत एकता मंचकडून तीव्र निषेध ; दोषींवर कठोर...

शासकीय कामातील कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यांचा राजपूत एकता मंचकडून तीव्र निषेध ; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

0
13

अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शासकीय कर्तव्य बजावत असताना ग्रामसेवक आणि महापालिका कंत्राटी कर्मचाऱ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यांचा अमळनेर तालुका राजपूत एकता मंचच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या घटनांची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच शासकीय कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मंचच्या वतीने अमळनेर प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना निवेदन देऊन करण्यात आली.

निवेदनात जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथील घटनेचा उल्लेख करण्यात आला आहे. ग्रामसभेदरम्यान शासकीय कर्तव्य बजावत असलेले ग्रामसेवक प्रल्हाद पाटील (वय ५२) यांच्यावर काही ग्रामस्थांनी मारहाण केली. या हल्ल्यातून जीव वाचवण्यासाठी पळत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर परिसरात महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज कचरुसिंग परदेशी (वय ३१) हे ७ ऑगस्ट २०२६ रोजी पथदिव्यांची दुरुस्ती करत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. शासकीय अथवा सार्वजनिक सेवा बजावत असलेल्या कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारे हल्ले होणे ही गंभीर बाब असून, यामुळे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे मंचने म्हटले आहे. “कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे संरक्षण ही शासनाची जबाबदारी आहे,” या भूमिकेतून संबंधित घटनांकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी राजपूत एकता मंचने केली. दोन्ही पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी संबंधित प्रशासनाला आवश्यक निर्देश द्यावेत, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

अशा घटनांमुळे केवळ संबंधित कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत नाही, तर शासकीय यंत्रणेच्या कामकाजावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे कर्तव्य बजावताना कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक असून, शासनाने याबाबत ठोस भूमिका घेण्याची गरज असल्याचे मंचच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले. अमळनेर प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी राजपूत एकता मंचचे निवेदन स्वीकारले. यावेळी मंचचे अध्यक्ष रणजित पाटील, अनिल पाटील, चेतन राजपूत, जयराम पाटील, विलास पाटील, जयदीप पाटील, डॉ. ज्ञानेश्वर शिंदे, अमोल राजपूत, कुणाल गिरासे, भोजराज राजपूत, दिलीप पाटील, रोहिदास पाटील, विक्रम पाटील, सुनील पाटील, गणेश पाटील, प्रकाश पाटील, समाधान धनगर, अजयसिंग पाटील, आशिष राजपूत, भरतसिंग पाटील यांच्यासह मंचचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


Protected Content

Play sound