सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वै.ह.भ.प. डिगंबर महाराज वारकरी सांप्रदायिक शिक्षण प्रचारक समिती, चिनावल, यावल व रावेर तालुक्याची सर्वसाधारण सभा चिनावल विद्यालयातील स्व. वाय एस पाटील सभागृह येथे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली काल पार पडली. सभेपूर्वी सकाळी आठ ते नऊ वाजे दरम्यान गावातून ह भ प दिगंबर महाराज चिनावलकर यांच्या स्मृतिस्थळावर दिंडी सोहळा पार पडला. त्यानंतर नऊ ते अकरा या वेळेत ह. भ. प. दुर्गादास महाराज नेहते खिर्डीकर यांचे कीर्तन झाले.
सर्वप्रथम गतवर्षी दिवंगत भाविकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर ह. भ. प. डिगंबर महाराज चिनावलकर यांच्या प्रतिमेस हारार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर रावेर व यावल तालुक्यातील संत मंडळींचा सत्कार करण्यात आला. यानंतर या संस्थेच्या सभासदांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. त्यामध्ये सन 23 – 24 चे जमा खर्च, तरीज, ऑडिट रिपोर्ट व ताळेबंद मंजूर करण्यात आला.
पंढरपूर येथे असलेल्या दोन चार मजली भक्तनिवासांमध्ये नवीन सभा मंडप उभारणीसाठीच्या निधीसाठी भाविकांना निधी देण्याचे आवाहन करण्यात आले. सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी व्यासपीठावर न्हावी येथील शरद महाजन, ह. भ. प. धनराज महाराज, ह. भ. प. पराग महाराज, संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, उपाध्यक्ष घनश्याम पाटील, सचिव व्हि. के. भंगाळे, सहसचिव विजय ढाके, कोषाध्यक्ष किशोर बोरोले, गणेश नेहेते, नितीन चौधरी, धनंजय चौधरी आणि रावेर-यावल तालुक्यातील सर्व ह.भ.प. महाराज मंडळी टाळकरी मंडळी रावेर व यावल तालुक्यातील सभासद मंडळ भजनी मंडळ उपस्थित होते. सभेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.