जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । परशूराम आर्थिक विकास मंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले आणि शिवसेना नेत्या सौ. अर्चनाताई सुरूडकर यांनी त्यांच्या जळगाव दौऱ्यादरम्यान ब्रह्मचैतन्य वेदपाठशाळेस भेट देत संस्थेच्या कार्याची माहिती घेतली आणि भरघोस मदतीचे आश्वासन दिले.
जळगाव शहरात अलीकडेच भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त १८ तारखेला अर्चनाताई सुरूडकर यांनी पालखी महोत्सवात सहभाग घेतला, तर रविवारी कॅप्टन आशिष दामले यांनी बहुभाषिक ब्राह्मण संघ आयोजित जयंती सोहळ्यास उपस्थिती दर्शवली.

ब्रह्मश्री परिवारचे अशोक वाघ यांच्या विनंतीवरून या दोन्ही मान्यवरांनी त्यांच्या पूर्वनियोजित दौऱ्यात ब्रह्मचैतन्य वेदपाठशाळेला भेट दिली. येथे त्यांनी वेदाचार्य गढीकर आणि वेदाभ्यासक विद्यार्थ्यांशी संवाद साधत शाळेच्या सध्याच्या परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली.
यावेळी ब्रह्मश्री बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोकजी वाघ, हार्दिक वाघ, सुनील कुलकर्णी, भाऊ कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, दीपक महाजन, प्रसाद निशानदार, राहुल कुलकर्णी तसेच इतर सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना कॅप्टन आशिष दामले यांनी वेदाभ्यास करणाऱ्या तसेच पौरोहित्य शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा मानस व्यक्त केला. तसेच शासकीय ब्राह्मण पौरोहित्य करणाऱ्यांसाठी विमा कवच आणि निवृत्ती वेतन योजना राबविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अशोक वाघ यांच्यासह ब्रह्मश्री परिवारातील सदस्यांनी परशुराम पालखी सोहळ्यासह वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम आणि मदतकार्य सुरू ठेवण्याचा संकल्प केला. अलीकडेच ब्रह्मश्री बहुउद्देशीय सर्व शाखीय ब्राह्मण संस्था, जळगावचे स्वतःचे संपर्क कार्यालय स्थापन करण्यात आले असून त्याचे उद्घाटनही उत्साहात पार पडले.
समाजाच्या प्रगतीसाठी ब्रह्मश्री परिवार करत असलेल्या कार्यामुळे नवीन सदस्य मोठ्या संख्येने जोडले जात असून, या उपक्रमांना समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.



