आरोग्य सेवक भरतीत बनावट सही-शिक्क्यांचा वापर, एकावर गुन्हा दाखल


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आरोग्य विभाग आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा बनावट शिक्का तसेच स्कॅन केलेली सही वापरून आरोग्य सेवक पदाचा बोगस नियुक्ती आदेश तयार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अमोल कैलास सुशीर (रा. जुना सातारा, भुसावळ) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आरोग्य सेवक पदासाठी भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या सहीने अधिकृत नियुक्ती आदेश संकेतस्थळावर जारी करण्यात आले होते. तसेच, उमेदवारांना ते ईमेलद्वारे पाठविण्यात आले होते.

आरोपी अमोल सुशीर याने याच अधिकृत आदेशांचा संदर्भ घेऊन स्वतःचा बनावट नियुक्ती आदेश तयार केला. या बनावट आदेशावर त्याने सार्वजनिक आरोग्य विभागाचा आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचा शिक्का तसेच त्यांची स्कॅन केलेली सही वापरली. हा बोगस आदेश मुक्ताईनगर पंचायत समितीच्या कार्यालयीन अधीक्षकांनी जिल्हा परिषदेच्या सहायक प्रशासन अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲपवर पाठवल्यानंतर हा प्रकार समोर आला. मूळ आदेश आणि बनावट आदेश यात मोठी तफावत आढळली.

विशेष म्हणजे, या बनावट आदेशाच्या आधारे नोकरी मिळवण्यासाठी अमोल सुशीर अद्याप जिल्हा परिषदेत हजर झालेला नाही. मात्र, त्याने बनावट सही आणि शिक्के वापरून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अमोल सुशीरविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे.