चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या भारताच्या निर्णयाला अमेरिकेचे समर्थन

नवी दिल्ली । ११८ चीनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या भारताच्या निर्णयाचे अमेरिकन सरकारने स्वागत केले असून अन्य देशांनीही याच प्रकारची कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

कालच केंद्रातील मोदी सरकारने मूळ चीनी असणार्‍या ११८ अ‍ॅप्सवर बंदी लादली असून यात ख्यातनाम अशा पब्जी मोबाईल या गेमसह अन्य अ‍ॅप्सचा समावेश आहे. दरम्यान, या अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या भारताच्या निर्णयाचे उघडपणे समर्थन करत अमेरिकेने सर्व स्वातंत्र्यप्रेमी देश आणि कंपन्यांना क्लीन नेटवर्क मध्ये जाण्याचे आवाहन केले.

भारताने यापूर्वी १०० अधिक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. आम्ही सर्व स्वातंत्र्य-प्रेमी राष्ट्रांना आणि कंपन्यांना क्लीन नेटवर्क मध्ये सामील होण्यासाठी आवाहन करत असल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने दिली. अमेरिकेच्या आर्थिक विकास, ऊर्जा आणि पर्यावरण विभागाचे राज्य सचिव कीथ क्रॅच यांनी याबाबत माहिती जाहीर केली आहे.

चिनी कम्युनिस्ट पक्षाने (सीसीपी) आक्रमक घुसखोरी केल्यामुळे नागरिकांच्या गोपनीयतेचे आणि त्याच्या कंपन्यांच्या अतिसंवेदनशील माहितीचे रक्षण करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने या वर्षाच्या सुरुवातीस क्लीन नेटवर्क प्रोग्राम सुरू केला होता. या अनुषंगाने भारत सरकारने चीनी अ‍ॅप्सबाबत घेतलेल्या भूमिकेचे अमेरिकेने स्वागत केल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे.

Protected Content