
सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वडगाव शिवार परिसरात पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आयुष्यावर घाला घालणारी तोडफोडीची घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी केळीच्या बागेतील सुमारे १८० खोडे कापून टाकल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही घटना बन्सी गारसे यांनी नफ्याने घेतलेल्या नथ्थू बढे यांच्या वाटणीत तसेच रमेश गारसे यांच्या वाटणीतील बागायत क्षेत्रात घडली. बन्सी गारसे यांच्या वाटणीत सुमारे ८० केळी खोडे, तर रमेश गारसे यांच्या शेतातील अंदाजे १०० केळी खोडे अज्ञातांनी कापून टाकल्याचे सकाळच्या सुमारास निदर्शनास आले. या पिकांवर शेतकऱ्यांनी मेहनत, वेळ आणि खर्च घालवला होता, त्यामुळे नुकसान लाखोंच्या घरात असल्याची शक्यता आहे.
गेल्या काही महिन्यांत वडगाव परिसरात अशा तोडफोडीच्या घटनांमध्ये खंड पडला होता. परंतु पुन्हा अशा प्रकारच्या घटनांनी उगम घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे. काही शेतकऱ्यांनी ही शेतकी वैमनस्यातून घडवून आणलेली कृती असण्याची शक्यता वर्तवली आहे. यामागे नेमकं कोण आहे, हे उघड करण्याची जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणाची माहिती तातडीने संबंधित पोलिस ठाण्यास देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केल्याचे समजते. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दोषींना शोधून कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



