जळगाव पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर : पाच जागा महिलांसाठी राखीव


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज आरक्षण सोडतीची प्रक्रिया पंचायत समिती सभागृहात पार पडली. ही सोडत प्रांत अधिकारी विनय गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी बारा वाजता घेण्यात आली. या सोडतीच्या पारदर्शकतेसाठी विद्यार्थ्यांच्या हस्ते ‘ईश्वर चिठ्ठी’ काढण्यात आली. यावेळी भूमिका व्यास, राहील इरफान खान आणि तनिष्का आहेर या विद्यार्थ्यांनी आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पाडली.

या प्रसंगी तहसीलदार शितल राजपूत, तहसीलदार राहुल वाघ, मंडळ अधिकारी प्रशांत निंबोळकर, अजिंक्य आंधळे, महसूल सहाय्यक अश्विनी वाघ, गंगाधर सोनवणे, दिनेश भोई आणि संजय बामणे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. या सोडतीदरम्यान निवडणुकीतील दहा गणांसाठी आरक्षणाचे निर्धारण करण्यात आले.

सोडतीतून पाच जागा महिलांसाठी राखीव ठरल्या असून त्यात अनुसूचित जातीसाठी एक, अनुसूचित जमातीसाठी दोन आणि नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी दोन जागांचा समावेश आहे. या अनुषंगाने कानळदा अनुसूचित जाती (महिला), ममुराबाद अनुसूचित जमाती (महिला), आसोदा सर्वसाधारण (महिला), कुसुम्बे सर्वसाधारण (महिला) आणि मोहाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) या पदांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे.

दरम्यान, इतर गणांसाठीही आरक्षणाचे निर्धारण करण्यात आले असून भोकर हा गण अनुसूचित जमातीसाठी राखीव राहील. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी भादली बु. राखीव ठेवण्यात आला आहे, तर म्हसावद, शिरसोली प्र.न. आणि धानवड हे गण सर्वसाधारण म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या आरक्षण प्रक्रियेने पंचायत समिती निवडणुकांची रंगत आणखी वाढली आहे.