सातपुडा निवासिनी श्री क्षेत्र मनुदेवी मंदिरास केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांची भेट

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्रीय क्रीडामंत्री रक्षाताई खडसे यांनी नुकतेच सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेल्या श्री क्षेत्र मनुदेवी मंदिराला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. या पवित्र तीर्थस्थळाच्या परिसराची पाहणी करून त्यांनी देवस्थान कामांची पाहणी करून आढावा घेतला.

यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उज्जैनसिंग राजपूत, यावल पंचायत समितीचे माजी सदस्य दीपक पाटील, डांभुर्णी येथील पुरोहित चौधरी, जयश्रीताई चौधरी, कांचनताई फालक, तसेच मनुदेवी संस्थेचे अध्यक्ष शांताराम पाटील व इतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चिंचोली येथे सत्कार सोहळा
मनुदेवी मंदिराच्या दौऱ्यादरम्यान रक्षाताई खडसे यांचा चिंचोलीजवळील चौफुलीवर यावल पंचायत समितीचे माजी उपसभापती गोकुळ पाटील आणि माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष सोळुंके यांच्या वतीने शाल, श्रीफळ देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. त्यानंतर रक्षाताई खडसे यांनी किनगाव येथे साजऱ्या होणाऱ्या ग्रामदैवत भवानी मातेच्या वार्षिक यात्रोत्सवात सहभागी होत भवानी मातेच्या मंदिरात दर्शन घेतले. यात्रोत्सवाच्या निमित्ताने गावकऱ्यांसोबत संवाद साधत त्यांनी भाविकांशी हितगुजही केले.

गौरी शक्ती महिला बचत गटाला भेट
महिला सक्षमीकरण आणि उपजीविका निर्माण करण्यासाठी किनगाव येथील गौरी शक्ती महिला बचत गटाने सुरू केलेल्या उपक्रमाला रक्षाताई खडसे यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी महिलांसोबत संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले आणि महिला बचत गटांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता. मनुदेवी मंदिर परिसराच्या विकासासाठी रक्षाताई खडसे यांनी शासनस्तरावर प्रयत्नांची ग्वाही दिली. धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी या तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे त्यांनी सांगितले. .

Protected Content