दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन

अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील लोढवे येथील स्व. आबासो एस. एस. पाटील माध्य. विद्यालयात इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षेसंदर्भातील विशेष मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आयुष्यात दहावीच्या परीक्षेला विशेष महत्त्व असून, योग्य नियोजन आणि परीक्षेचे स्वरूप समजून घेतल्यास परीक्षेची भीती दूर होऊ शकते, असा विश्वास या कार्यशाळेतून व्यक्त करण्यात आला.

येत्या २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान घेण्यात येणाऱ्या दहावीच्या बोर्ड परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मानसिक तयारी आणि सरावाचा अनुभव देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच अनुषंगाने, स्व. आबासो एस. एस. पाटील विद्यालयात अमळनेर येथील साने गुरुजी कन्या हायस्कूलचे वरिष्ठ शिक्षक व बोर्ड परीक्षा नियामक श्री. दिलीप बळीराम पाटील यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थ्यांना परीक्षेचे स्वरूप आणि महत्त्व समजावून सांगणे. वेळेचे योग्य व्यवस्थापन आणि अभ्यासाचे नियोजन. सराव परीक्षा आणि बोर्ड पेपर सोडवण्याच्या पद्धती. आत्मविश्वास वाढवण्यासाठी मानसिक तयारीचे महत्त्व. यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील यांनी दिलीप पाटील यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन दीपक मुरलीधर पवार यांनी केले. कार्यक्रमाला मनोहर देसले, मिलिंद पाटील, तसेच इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content