रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवरचा विश्वास कायम ठेवला तर यश मिळवता येते, हे रावेर शहरातील कांचन जयंत महाजन यांच्या यशातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. शेतमजूर विधवा आईने काबाडकष्ट करून मुलांना शिक्षण दिले आणि मुलीने अथक मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत आईच्या संघर्षाला यशाची सोनेरी किनार दिली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या STI (सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर) पदाच्या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत कांचन जयंत महाजन यांनी ओबीसी प्रवर्गातून २३ वा क्रमांक मिळवत STI पदावर दैदिप्यमान यश संपादन केले. कांचनच्या या यशाची बातमी समजताच कुटुंबीयांसह रावेर शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कांचन महाजन यांनी बी.एस्सी.पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांच्या वडिलांचे सुमारे १९ वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या आई हेमलता महाजन यांच्या खांद्यावर आली. एक मुलगा आणि एक मुलगी अशा दोन्ही मुलांचे पालनपोषण व शिक्षण करण्यासाठी हेमलता महाजन यांनी शेतमजुरी करून संसाराचा गाडा चालविला. उन्हाची तीव्रता असो अथवा पावसाची पर्वा न करता त्यांनी शेतात कष्ट केले; मात्र मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता पडू दिली नाही.

आईच्या या संघर्षातून प्रेरणा घेत कांचन यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली. आर्थिक अडचणी आणि विविध प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत त्यांनी अभ्यासातील सातत्य कायम राखले. जिद्द, नियोजनबद्ध अभ्यास आणि अथक मेहनतीच्या जोरावर अखेर त्यांनी एमपीएससीच्या अंतिम परीक्षेत २३ वा क्रमांक पटकावून आपल्या आईच्या कष्टांचे चीज केले. आपल्या यशाबद्दल भावना व्यक्त करताना कांचन महाजन यांनी, “आईने केलेल्या कष्टांमुळेच आज मी या यशाच्या शिखरावर पोहोचले,” असे सांगितले. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवक-युवतींना त्यांनी स्वप्नांवर आणि मेहनतीवर विश्वास ठेवण्याचे आवाहन केले. नैराश्यात न जाता उपलब्ध संधी ओळखून जिद्दीने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते, असा प्रेरणादायी संदेशही त्यांनी दिला.



