Home आरोग्य धरती आबा अभियानातून मोहमांडलीत सर्वसमावेशक आरोग्यसेवा 

धरती आबा अभियानातून मोहमांडलीत सर्वसमावेशक आरोग्यसेवा 

0
9

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सातपुडा पर्वतरांगातील अतिदुर्गम मोहमांडली गावात ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आदिवासी नागरिकांसाठी सर्वसमावेशक आरोग्य तपासणी व आरोग्यसेवा उपक्रम राबविण्यात आला. भारत सरकारच्या आदिवासी कार्य मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि आदिवासी विकास विभागाच्या समन्वयातून धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत हा उपक्रम घेण्यात आला. विशेष म्हणजे, याच उपक्रमादरम्यान मोहमांडली उपकेंद्रात एका आदिवासी महिलेची सुरक्षित व सुखरूप प्रसूती करण्यात आली.

जिल्हाधिकारी राहुल घुगे तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या समन्वयाने हा आरोग्य उपक्रम राबविण्यात आला. दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. ‘आरोग्यदायी आदिवासी समाज–सशक्त आदिवासी समाज’ या संकल्पनेतून नागरिकांची रक्तदाब (BP), रक्तातील साखर (BSL) तसेच असंसर्गजन्य आजार (NCD) संदर्भातील आवश्यक तपासणी करण्यात आली. यासोबतच मुली, गरोदर माता आणि ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आवश्यक उपचार, औषधोपचार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शनही देण्यात आले. या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे मोहमांडली येथील आरोग्य उपकेंद्रात एका आदिवासी महिलेची सुरक्षित आणि सुखरूप प्रसूती करण्यात आली. दुर्गम व डोंगराळ भागात वेळेवर प्रसूती सेवा उपलब्ध झाल्याने माता आणि नवजात बाळाच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य यंत्रणा पोहोचविण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना या उपक्रमातून महत्त्वपूर्ण यश मिळाले.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. दीपल पाटील आणि डॉ. सलमान पटेल यांच्या देखरेखीखाली आरोग्य विभागाच्या पथकाने संपूर्ण उपक्रम यशस्वीपणे राबविला. श्रीमती वैशाली तळेले, डॉ. रमीज सय्यद, मुबारक तडवी तसेच आशा कार्यकर्त्यांनीही आरोग्यसेवा देताना विशेष योगदान दिले. सातपुडा पर्वतातील दुर्गम आदिवासी भागातील शेवटच्या नागरिकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचावी, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला. ‘कोणीही आरोग्यसेवेपासून वंचित राहू नये’ या संकल्पनेची प्रभावी अंमलबजावणी या माध्यमातून झाल्याचे दिसून आले.


Protected Content

Play sound