Home क्राईम आश्रम शाळेत कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने दुदैवी मृत्यू

आश्रम शाळेत कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने दुदैवी मृत्यू


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या वाघझिरा येथील शासकीय आश्रम शाळेत एका कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली. या घटनेमुळे आश्रम शाळेतील कर्मचारी, विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.

यावल येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत वाघझिरा आश्रम शाळेत रोजंदारी तत्त्वावर कार्यरत लुकमान रहमान तडवी (वय ४०) या तरुण कर्मचाऱ्याला सायंकाळी ड्यूटीवर असताना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. झटका इतका जोरदार होता की, तो जमिनीवर कोसळला. सहकाऱ्यांनी तातडीने त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

लुकमान तडवी यांच्या अकाली मृत्यूने वाघझिरा आश्रम शाळेत शोकमय वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या निधनामुळे विद्यार्थी आणि सहकाऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. कर्मचाऱ्याच्या निधनाची वार्ता कळताच परिसरातील नागरिकांनीही दु:ख व्यक्त केले. लुकमान तडवी यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या कुटुंबावर या दुर्दैवी घटनेमुळे मोठा आघात झाला आहे. परिवाराचा आधारवड हरपल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वाघझिरा आश्रम शाळेतून विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि विकास साधण्याचे काम करण्यात तडवी यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या अकाली निधनाने शाळेसह समाजात हळहळ व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound