जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीसाठी अमरावती येथून बंदोबस्तासाठी आलेल्या संतोष बापुराव चऱ्हाटे (वय ४८, रा. चिंचोली बु, रहिमापुर, ता. आंजनगाव, जि. अमरावती) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी १२ मे रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास खान्देश सेंट्रल मॉल येथे उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यात सोमवारी १३ मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्यासाठी इतर जिल्ह्यातून पोलिसांसह होमगार्डचा अतिरीक्त बंदोबस्त मागविण्यात आला आहे. यामध्ये अमरावती येथील ३०० होमागार्ड १० मे रोजी सायंकाळी बंदोबस्तासाठी जळगावात आले आहेत. त्यांच्या राहण्याची व्यवस्था ही खान्देश सेंट्रल मॉल याठिकाणी करण्यात आली आहे. त्यानुसार याठिकाणी अमरावती जिल्ह्यातील दर्यापुर विभागातील होमगार्ड संतोष बापुराव चऱ्हाटे यांना पी. एम. मुंदडे माध्यमिक विद्यालय पिंप्राळा येथे परिसर बंदोबस्तासाठी त्यांची नेमणुक करण्यात आली होती. तसेच रविवार १२ रोजी सकाळी आठ वाजता त्यांना एकलव्य क्रीडा संकुल येथे मतदान साहित्य वाटपाठिकाणी बोलवण्यात आले होते.
शनिवारी १२ मे रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास संतोष चऱ्हाटे हे त्यांचे सहकारी अंकुश मारोतराव पडोळे यांच्यासोबत जेवण केले. त्यानंतर ते झोपण्यासाठी गेले असता, संतोष चऱ्हाटे यांनी पडोळे यांना छातीत किरकोळ दुखत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी गोळी घेतली आणि छातीला बाम लावून ते झोपून गेले.
सकाळी मतदान साहित्य वाटपठिकाणी जायचे असल्याने पडोळे यांनी त्यांचे सहकारी चऱ्हाटे यांना सकाळी ५.३० वाजता उठविण्यासाठी गेले. ते हालचाल करीत नसल्याने तसेच त्यांचे शरीर थंडगार जाणवल्याने त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करीत मयत घोषीत केले. तसेच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात होमागार्ड संतोष चऱ्हाटे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह अमरावती येथे रवाना करण्यात आला. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास पोहेकॉ विरेंद्र शिंदे हे करीत आहे.