सातारा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासदार सुप्रीया सुळे, माजी मंत्री पंकजा मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अखेर किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी बिनशर्त माफी मागितली आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटल्यानंतर आज अखेर बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली आहे. ते म्हणाले की, राजकीय हेतूने हे आरोप केले नाहीत. ज्या चार लोकांवर मी आरोप केले त्यांचीच नव्हे तर इतर लोकांचीही माफी मागत आहे. माझं विधान अनावधानाने झालं आहे. त्याबद्दल मी क्षमा मागत आहे.
कराडकर पुढे म्हणाले की, सुप्रियाताई आणि मी अनेकवेळेला एकत्र आलो आहे. आम्ही बोललो आहे. मी त्यांना ताई म्हणतो. पंकजा यांना भेटलो नाही. पण त्यांच्या वडील गोपीनाथ मुंडे यांचं आणि माझं प्रेमाचं नातं होतं. शरद पवार आणि मी आमच्या वयात दहा-बारा वर्षाचा फरक असला तरी मी सुप्रियाताईंना मी कन्येच्या ठिकाणी मानतो. पंकजा यांनाही कन्येच्या ठिकाणी मानतो. त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला असेल तरी या दोन्ही माझ्या मुली समजून बाप या नात्याने मी क्षमा मागत आहे. मी केवळ समाजातील ऐकिव माहितीवर ते विधान केलं होतं. माझं पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्याशी माझं बोलणं झालं नाही. त्यांना भेटून मी दिलगीरी व्यक्त करणार आहे. या दोन्ही नेत्या निर्व्यसनी आहेत, असं कराडकर म्हणाले.
बंडातात्या म्हणाले की, अजित पवार यांच्याबद्दल मला आदरच आहे. मी फक्त वाईनच्या निर्णयावर व्यवहारातील म्हण म्हटली होती. ढवळ्याशेजारी पोवळा बांधला असं मी म्हटलं. केवळ धार्मिक निर्णयाच्या अनुषंगाने मी बोललो होतो. वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून धार्मिक निर्णय लादले जातात, त्याबाबत घेतलेली भूमिका चुकीची आहे, असं मला वाटत नाही, असं त्यांनी सांगितलं. राजकीय नेत्यांची माफी मागितल्याने माझं अध्यात्मिक आणि नैतिक वजन वाढलंच आहे, असंही त्यांनी सांगितलं.