राजकीय अतिसाराने सत्ताधार्‍यांची बुध्दी व मन गोठले- शिवसेना

मुंबई प्रतिनिधी । शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल करत थंडीने दवबिंदू गोठतात तसे राजकीय अतिसाराने सत्ताधार्‍यांची बुद्धी व मन गोठले असल्याची टीका केली आहे.

उध्दव ठाकरे यांनी सामनातील अग्रलेखाच्या माध्यमातून भाजवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. यात म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आत्मबलाचे कौतुक करावे तेवढे थोडेच. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत पुणे मुक्कामी श्री. फडणवीस यांनी नारा दिला आहे की, गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आम्ही ४२ जागा जिंकल्या होत्या. यावेळी आम्ही कुठल्याही परिस्थितीत ४३ जागा जिंकू. फडणवीस यांचा असाही दावा आहे की, यावेळी आम्ही बारामतीत पवारांचा पाडाव करू. यावर पवारांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे भाजपास शुभेच्छा दिल्या आहेत. खरे तर महाराष्ट्रातील पैकीच्या पैकी म्हणजे ४८ जागा हे लोक सहज जिंकू शकतात व देशात स्वबळावर ५४८ जागा कुठेच गेल्या नाहीत. ईव्हीएमम आणि असा हा फसफसणारा आत्मविश्‍वास सोबतीला असताना लंडन, अमेरिकेतही कमळ फुलू शकेल, पण त्याआधी अयोध्येत राममंदिराचे कमळ का फुलले नाही? याचे उत्तर द्या.

राज्यकर्त्या पक्षात जो संयम, विनम्र भाव असायला हवा तो अलीकडच्या काळात नष्ट झाला आहे. एक प्रकारची राजकीय बधिरता निर्माण झाली आहे. विरोधी पक्ष बेलगाम बोलतो हे मान्य, पण म्हणून सत्ताधारी पक्षानेही असे बेलगाम बोलू नये. जनता मरू द्या, राज्य खाक होऊ द्या, पण राजकारण टिकले पाहिजे. याला पाडू, त्याला पाडू असे सध्या सुरू आहे. याच धुंदीत उद्या हे स्वतःच कोसळतील, तरीही यांचा गिरे तो भी टांग उपर या पद्धतीने कारभार सुरूच राहील. थंडीने दवबिंदू गोठतात तसे राजकीय अतिसाराने सत्ताधार्‍यांची बुद्धी व मन गोठले आहे असा आरोप यात करण्यात आला आहे.

Add Comment

Protected Content