आज हिंदुत्वाचा गजर आणि उद्या विसर असे होऊ नये- ठाकरे

मुंबई प्रतिनिधी । शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेचे कौतुक करतांना आज हिंदुत्वाचा गजर आणि उद्या विसर अशी गत होता कामा नये असा टोला मारला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या सामनामध्ये आज हिंदुत्वावर भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, पाच हजार वर्षांच्या आपल्या संस्कृतीवर हिंदू दहशतवाद हा कलंक काँग्रेसने लावला. हिंदूंना दहशतवादी म्हणून कलंकित करणार्‍या काँग्रेसला आपण माफ करणार का? असा सवाल मोदी यांनी केला व २०१९ च्या रणांगणात हिंदुत्वाचे कार्ड आक्रमकपणे फेकले. भगवा दहशतवाद किंवा हिंदू दहशतवाद हे शब्द प्रचलित झाले. हिंदू दहशतवाद्यांनी समझोता एक्सप्रेस व मालेगावात बॉम्बस्फोट घडविल्याचा आरोप फक्त झाला नाही, तर बनावट पुरावे उभे करून खटले दाखल झाले. स्वामी असिमानंद, साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित यांना अटक करून त्यांच्यावर भयंकर अत्याचार केले. २६/११च्या हल्ल्यात शहीद झालेले करकरे, कामटे, साळसकर आदी पोलीस अधिकारी हे अतिरेक्यांनी मारले नाहीत, तर ते हिंदू दहशतवादाचे बळी ठरल्याची बकवासही काँग्रेस पुढार्‍यांनी केली होती. हे देशाचे दुर्दैवच होते. या सगळया प्रकाराने हिंदुस्थानची जगात नाचक्की झाली.

अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, इंग्रजांच्या इतिहासातही हिंदू दहशतवादाची नोंद नाही, कश्मीरातील नेते सरळ सरळ देशविरोधी भूमिका घेत आहेत. या मंडळींनी सरळ सरळ हिंदुस्थानची घटना व कायदे मंडळालाच आव्हान दिले आहे. या विचारांची कीड वेळीच पायाखाली चिरडली नाही तर कश्मीर कायमचा अशांत व अस्थिर राहील. हिंदुत्वाची गर्जनाच देशाला सुरक्षेची कवचकुंडले देईल. तेव्हा आज निवडणुकीत हिंदुत्वाचा गजर व निवडणुका संपल्यावर विसर असे निदान आता तरी घडू नये अशी अपेक्षा यात व्यक्त करण्यात आली आहे.

Add Comment

Protected Content