मराठा आरक्षणासाठी उदया एकदिवसीय विशेष अधिवेशन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठा समाजाला टिकणारे व कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी मंगळवार ता.२० रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किल्ले शिवनेरी ता.जुन्नर येथे सांगितले.

शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने किल्ले शिवनेरीवर मराठा सेवा संघाच्या अभिवादन सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले, ओबीसी किंवा इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता तसेच इतर कोणाचेही नुकसान न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अधिवेशन बोलविण्यात आले आहे. राज्य सरकार सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारे सर्व समावेशक सरकार आहे.

दरम्यान सभेपासून जवळच असलेल्या शिवकुंज वास्तूजवळ सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. सभेनंतर मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री हेलिकॅप्टरकडे जात असताना कार्यकर्त्यांनी नाही कुणाच्या बापाचे, आरक्षण आमच्या हक्काचे, मराठा समाजाला आरक्षण द्या, अशा घोषणा देत परिसर दुमदुमून टाकला होता. विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांनी देखील सभेनंतर सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांत सहभागी होत आरक्षणाच्या घोषणा दिल्या. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

शिवजन्म सोहळ्यानंतर दरवर्षी प्रथेप्रमाणे शिवकुंज मधील बाल शिवाजी व जिजाऊ मातेस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतात. यावेळी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाल्याने त्यांनी येथे येण्याचे टाळले. किल्ले शिवनेरी ता.जुन्नर येथे शिवकुंज येथे मराठा आरक्षणाच्या घोषणा देणारे कार्यकर्ते

Protected Content