गोदावरी नर्सिंगच्या शिवजन्मोत्सव सोहळ्याने फेडले डोळ्यांचे पारणे

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोदावरी संस्थेच्या माध्यमातून तरूण पिढी घडविण्याचे महान कार्य केले जात आहे. समाजाला डॉक्टर, परिचारीका देण्याचे काम केले जात आहे. शिवरायांच्या विचारांचा रथ खर्‍या अर्थाने गोदावरी संस्थेच्या माध्यमातून ओढला जात आहे. त्यामुळे शिवचरित्राच्या माध्यमातून शिवरायांचा हा विचार सतत तेवत ठेवा असे आवाहन शिवव्याख्याते प्रा. प्रदीप देसले यांनी आज येथे केले.

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाचे आयोजन डॉ. केतकी पाटील सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी आयोजित छत्रपती शिवशंभुंचा धगधगता इतिहास याविषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरूवातील गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांचे पूजन आणि महाआरती करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमकुमार पंडीत, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा गनवीर हे उपस्थित होते.

या कार्यक्रमात नर्सिंग महाविद्यालयाच्या जीएनएम प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी पाळणा…पाळणा…बाळ शिवाजीचा हा शिवजन्मोत्सव देखावा सादर केला. तसेच तानाजी मालुसरे आणि उदयभान युध्दाचाही प्रसंग विद्यार्थ्यांनी साकारला. यावेळी उपस्थितांच्या अंगावर शहारे आले होते. तानाजी मालुसरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील भावनिक संवादाने सभागृहातील वातावरण स्तब्ध झाले होते. तसेच आकाश वाघमारे याने कोण शिवबा? यावर कविता सादर केली. कार्यक्रमात शिवाजी महाराज यांची वेशभूषा पृथ्वी आडे आणि माँ जिजाऊंची वेशभूषा रश्मी खडसे यांनी साकारली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी राखाडे आणि स्नेहल लाखे या विद्यार्थीनींनी केले. तर आभार
प्राची बनसोड हिने मानले. याप्रसंगी नर्सिंग महाविद्यालयाचे रजीस्ट्रार प्रवीण कोल्हे, डॉ. प्रियदर्शनी मून, प्रा. पियूष वाघ, रेबेका लोंढे, सुमैय्या शेख, साक्षी गायकवाड यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केेले.

सांस्कृतिक कार्यक्रमानंतर शिवव्याख्याते प्रा. प्रदीप देसले यांनी छत्रपती शिवशंभुंचा धगधगता इतिहास या विषयावर विचार मांडले. प्रा. देसले यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही जातीभेद पाळला नाही. 12 बलुतेदार, 18 अलुतेदारांना घेऊन त्यांनी स्वराज्याची निर्मीती केली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज या महान विभूतींनी समाजातील अस्पृश्यता मिटविण्याचे कार्य केले. शिवा काशिद, तानाजी मालुसरे, यांचे प्रसंग त्यांनी व्याख्यानातून मांडले. तसेच ज्या घरात खर्‍या अर्थाने शहाजी महाराज आणि मॉ जिजाऊ असतील तेथे शिवबा घडतील असेही त्यांनी सांगितले. शिवरायांचा वैचारीक रथ पुढे नेण्यासाठी शिवचरित्राचे वाचन करा असा सल्लाही प्रा. देसले यांनी दिला.

पोस्टर प्रदर्शनातील विजेत्यांचा गौरव
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमीत्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातफे पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्या शेख हुमेरा शकील (प्रथम), प्रतीक्षा दाते (द्वितीय), शितल जाधव (तृतीय) या विद्यार्थीनींना शिवचरित्र देऊन त्यांचा माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

Protected Content