Breaking : भीषण अपघातात दुचाकीवरील दोन युवक जागीच ठार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव कार आणि दुचाकी यांच्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना रामदेववाडी जवळील हनुमान मंदिराजवळ सोमवारी ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास घडली. दोघांचे मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून नातेवाईकांची प्रचंड गर्दी जमली होती.

रफिक हुसेन मेवाती (वय-23) आणि अरबाज जहांगीर मेवाती (वय 20) दोन्ही रा.राणीचे बांबरुड ता.पाचोरा असे मयत झालेल्या दोन्ही तरुणांचे नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, रफिक हुसेन मेवाती हा तरुण आपल्या परिवारासह पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरुड येथे वास्तव्याला होता. जळगाव शहरातील मास्टर कॉलनी पेरू विक्रीकरून आपला व्यवसाय करीत होता. सोमवारी ५ डिसेंबर रोजी दिवसभर पेरूची विक्री करून सायंकाळी साडेसहा वाजता दुचाकी (एमएच १९ सीएच ४३५९) रफिक मेवाती हा त्याचा मित्र अरबाज जहांगीर मेवाती (वय-२१) याच्यासोबत राणीचे बांबरुड येथे घरी जाण्यासाठी निघाले होते. शिरसोली गावाच्या पुढे असलेल्या हनुमान मंदिराजवळून दुचाकीने जात असताना पाचोऱ्याकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या कार क्रमांक (एमएच १९ बीजे २१७५) ने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रफिक मेवाती आणि अरबाज मेवाती हे दोघे युवक जागीच ठार झाले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केले. अपघात घडल्यानंतर नातेवाईकांसह व मित्रपरिवाराने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड गर्दी केली होती. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Protected Content