डंपर-मालवाहू वाहनाच्या भीषण अपघातात दोन महिला मजूरांचा जागीच मृत्यू

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर गावाजवळील हॉटेल अरमान जवळ मजूरांना घेवून जाणाऱ्या भरधाव डंपरने समोरून येणाऱ्या मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात डंपरमध्ये बसलेल्या दोन महिला मजूरांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी १९ मार्च रोजी रात्री १० वाजता घडली होती. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात डंपरवरील अज्ञात चालकाविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, तळेगाव येथून भुसावळ येथे महिला मजुरांना घेऊन जाणारा डंपर क्रमांक (एमएच-०५ के ९९३६) हा मंगळवार १९ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर रस्त्यावरील हॉटेल आरमान जवळून जात असताना समोरून येणाऱ्या मालवाहू वाहन क्रमांक (एमएच-२० सीजी ४४२९) ला जोरदार धडक दिली. या धडकेत सोनीबाई सोमनाथ यादव (वय-३०, रा. तीनगड्डा राज्य छत्तीसगड) आणि सरस्वती रामप्रसाद उईके (वय-१७, रा. दिंडोरी मध्य प्रदेश) या दोन जणांचा जागाीच मृत्यू झाला तर इतर मजूर किरकोळ जखमी झाले. दरम्यान या अपघात प्रकरणी बुधवार २० मार्च रोजी दुपारी ३.३० वाजता डंपर वरील अज्ञात चालका विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहे.

Protected Content