सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गुरांना अतिशय निर्दयतेने बांधून वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर सावदा पोलीसांनी धडक कारवाई करत वाहनांची सुटका करण्यात आली. ही घटना चिनावल ते कुंभारखेडा रस्त्यावर मंगळवारी ११ ऑक्टोबर रोजी पहाटे करण्यात आली. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावदा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गुंराची निर्दयतेने वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास इंगोले यांना मिळाली. त्यानुसार मंगळवारी ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता पोलीसांनी चिनावल ते कुंभारखेडा रस्त्यावरील निर्मल युवरात महाजन यांच्या शेतातजवळ दोन टाटा कंपनीचे छोटा हत्ती क्रमांक (एमएच ०४ डीके ७१०२ आणि एमएच ०४ इवाय २११८) वाहनांची तपासणी करण्यात आली. या दोन्ही वाहनांमध्ये ५ गायी आणि ४ वासरे यांनी निर्दयतेने बांधून अवैधरित्या वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. दोन्ही वाहने पोलीसांनी जप्त केली असून गुरांची सुटका करण्यात आली आहे. सावदा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल तुषार मोरे यांच्या फिर्यादीवरून शेख आबिद उर्फ नव्वद शेख आणि मोहम्मद फैजान शेख सगीर दोन्ही रा. सावदा ता.रावेर यांच्या विरोधात सावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विनोद तडवी करीत आहे.