जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव-भुसावळ महामार्गावर खेडी गावाजवळ बुधवारी दुपारी एक भीषण अपघात झाला. एका भरधाव मालवाहू रिक्षाने दुचाकीला धडक दिल्यानंतर, मागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने पुन्हा जोरदार धडक दिल्याने समाधान बापू भोई (वय ३२, रा. भालगाव, ता. एरंडोल) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे भालगाव परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समाधान भोई हे व्यवसायाने फळविक्रेते होते. बुधवारी १ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ते आपल्या दुचाकीने भुसावळकडून जळगावकडे येत असताना, समोरून येणाऱ्या एका मालवाहू रिक्षाने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे समाधान भोई रस्त्यावर फेकले गेले. त्याच वेळी रिक्षाच्या पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या एका दुचाकीने त्यांना पुन्हा धडक दिली. या दुहेरी अपघातात समाधान गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र मोरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने समाधान यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. धक्कादायक बाब म्हणजे, अपघात झाल्यानंतर धडक देणारे वाहन चालक घटनास्थळावरून वाहन घेऊन फरार झाले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. समाधान भोई यांच्या पश्चात पत्नी, मुले आणि असा मोठा परिवार आहे. घराचा कर्ता पुरुष गेल्याने भोई कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास पोहेकॉ गफूर तडवी हे करीत आहे.



