जळगाव प्रतिनिधी । केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून केळी खरेदी करुन पैसे न देता फसवणूक करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांना तालुका पोलिसांनी सोमवारी अटक केली. तर दोन संशयित अद्याप बेपत्ता आहेत.
या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.अशोक रघुनाथ पाटील (वय ५३, रा.निंभोरा, ता.रावेर) व सय्यद गंभीर सय्यद सांडू (वय ६०, रा.सावदा, ता.रावेर) असे अटक केलेल्या संशयित व्यापाऱ्यांची नावे आहेत. तर फिरोज गंभीर तडवी (रा.अमोदा, ता.यावल) व सय्यद इब्राहीम सय्यद गंभीर (रा.सावदा, ता.रावेर) हे दोन संशयित बेपत्ता आहेत.
गतवर्षी दाखल पहिल्या गुन्ह्यात नारायण तुकाराम सोनवणे (रा.धानोरा बु, ता.जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. सोनवणे यांची १ लाख ३८ हजार ३३४ रुपयांची केळी अशोक पाटील या व्यापाऱ्याने खरेदी केली होती. परंतू, त्याचे पैसे दिले नव्हते. सोनवणे यांनी पैसे मागीतले असता पाटील बेपत्ता झाला होता. अखेर सोनवणे यांनी पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दाखल केली. त्यानुसार दाखल गुन्ह्यात पाटील याला अटक करण्यात आली.
तर दुसरा गुन्हा १६ सप्टेबर २०२० रोजी दाखल करण्यात आला. यात बाळु प्रेमराज पाटील (रा.गाढोदा, ता.जळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. बाळु पाटील यांची १ लाख ४१ हजार ३८९ रुपयांची केळी सय्यद गंभीर सय्यद सांडू याच्यासह तीघांनी खरेदी केली होती. परंतू, पाटील यांचे पैसे न देता तीघेजण बेपत्ता झाले होते. यातील सय्यद गंभीर याला सोमवारी ताुलका पोलिसांनी अटक केली.