तिरूअनंतपुरम विमानतळावर दोन दहशतवादी अटकेत

तिरूअनंतपुरम वृत्तसंस्था । येथील विमानतळावर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा अर्थात एनआयएने सौदी अरेबियातून आलेल्या दोन दहशतवाद्यांना अटक केले असून त्यांचा बंगळुरूतील स्फोटांमध्ये सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) सोमवारी रात्री केरळमधील तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन जणांना तीन तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतले. सूत्रांनी सांगितले की, दोन्ही जण दहशतवादी असून ते सौदी अरेबियातून येथे आल्यानंतर एनआयएने त्यांना गजाआड केले. त्यापैकी एक गुल नवाज उत्तर प्रदेशातील आणि दुसरा शुहैब हा केरळमधील कन्नूर येथील रहिवासी आहे. यातील एक लष्कर-ए-तैयबा व इतर इंडियन मुजाहिद्दीनशी संबंधित आहे. या दोघांना विमानतळावरून ताब्यात घेतल्यानंतर गुप्तचर संस्था रॉ यांच्यासह अनेक तपास यंत्रणांनी त्यांची सुमारे तीन तास चौकशी केली.

सूत्रांच्या माहितीनुसार, गुल नवाज याला कोची येथे नेले जाईल. तेथे चौकशी केल्यानंतर त्याला दिल्लीला नेेले जाणार आहे. तर शुहबला बेंगळुरूला चौकशीसाठी घेऊन जाणार आहे. बंगळुरुमध्ये झालेल्या स्फोटाच्या संदर्भात ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी त्यांच्याविरूद्ध लूकआऊट नोटीसही बजावण्यात आली आहे.

यापूर्वी १ सप्टेंबर रोजी एनआयएने केरळमधील एनरकुलम येथून तीन आणि पश्‍चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथून सहा दहशतवाद्यांना अटक केली होती. यानंतर या दोघांना केलेली अटक ही महत्वपूर्ण मानली जात आहे.

Protected Content