पाचोर्‍यात एकाच जागेवर दोन पुरवठा निरीक्षण अधिकारी; प्रशासनाचा सावळा गोंधळ

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा तालुका तहसील कार्यालयात पुरवठा विभागाच्या पुरवठा निरीक्षक पदाच्या एका जागेवर दोन महिला पुरवठा निरीक्षक अधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुका हा अनेक महसूल विषयक कारणांमुळे अनेकदा चर्चेत असतो. वाळूचोरी विरोधातील संशयास्पद कारवाया असोत की लाचखोरीची कारवाई असो, वा तत्सम पुरवठा विभागातील दलालखोरीशी असलेली हातमिळवणी असो, या ना त्या अनेक चर्चामुळे जनमानसात पाचोरा तहसील प्रशासन कायम संशयाच्या भोवऱ्यात असते. त्यातच आता एकाच जागेवर दोन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे नेमके गौडबंगाल काय याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सप्टेंबर – २०१९ मध्ये पाचोरा पुरवठा शाखेत पूनम थोरात नामक महिला अधिकार्‍याची पुरवठा निरीक्षण अधिकारी या पदावर पदोन्नतीने नियुक्ती झाली होती. मात्र त्यांची कोणतीही मागणी नसतांना प्रशासनाने त्यांची सेवा जळगाव पुरवठा शाखेत वर्ग करून त्यांचे जागेवर जळगाव पुरवठा शाखेत मूळ नियुक्तीवर असलेल्या दिपाली ब्राह्मणकर यांची प्रतिनियुक्ती पाचोरा पुरवठा शाखेत केली. तर आता पुन्हा पूनम थोरात यांना त्याच्या मूळ पदावर पदस्थापना केल्यानंतर दिपाली ब्राम्हणकर यांना देखील त्यांच्या मूळ जळगाव येथे त्यांच्या कार्यालयीन ठिकाणी बदली करणे अपेक्षित असतांना जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसिलदार यांनी आदेश काढत दोन्ही नायब तहसिलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी एकाच पदावर काम करण्याचे उरफाटे आदेश दिले आहेत. नेमके एकाच जागेवर दोन महिला अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्याचे कारण काय याविषयी उलट – सुलट चर्चा होत आहे. तर  यामागे काही आर्थिक लागेबांधे तर नाहीत ना ? अशी शंका व्यक्त होत आहे.

Protected Content