चाळीसगावात नियमांचे उल्लंघन; डेअरी दुकानावर कारवाई

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरात संचारबंदी लागू असताना शहरातील अंकुर डेअरी दुकानात सर्रासपणे माल विक्री करून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास येताच नगरपालिका व पोलिस प्रशासनातर्फे सदर दुकानावर संयुक्त कारवाई करण्यात आली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन तालुक्यात कलम -१४४ प्रमाणे संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आले आहे. या संचारबंदीत सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे. नगरपालिका कर्मचारी व शहर पोलिस शहरात गस्त घालत असताना शहरातील शिवशक्ती हॉस्पिटल समोरील अंकुर डेअरी दुकानात दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास माल विक्री होत असल्याचे कळताच सदर दुकानावर छापा टाकून कारवाई करण्यात आली. हि कारवाई १९ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास करण्यात आली. पोलिसांनी सदर दुकान चालकाचे नाव विचारले असता विकास पांडुरंग कोतकर असल्याचे सांगितले. पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार, पोकॉ अमोल भरत पाटील , नगरपालिका कर्मचारी संदीप राजेंद्र परदेशी व निलेश नारायण चौधरी आदींनी हि कारवाई केली. पोकॉ अमोल भरत पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम- १८८, २६९, २७० व २७१ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल पवार हे करीत आहेत.

Protected Content