राज्यस्तरीय हॉकी निवड चाचणीसाठी दोन खेळाडूंची निवड !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येत्या ३ ते १४ जुलै रोजी रांची येथे होणाऱ्या १५ व्या हॉकी इंडिया सब-ज्युनियर वुमन नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी हॉकी महाराष्ट्रतर्फे महाराष्ट्र राज्याचा संघ पुणे येथे निवडण्यात येणार आहे. या राज्यस्तरीय निवड चाचणीसाठी जळगाव जिल्ह्यातून १५ वर्षांखालील दोन उत्कृष्ट खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. २९ मे रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, जळगाव येथे या खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आला.

निवड झालेल्या खेळाडूंची नावे रितीमा पंचनाल बारेला आणि रशीला बन्सीलाल बारेला अशी असून, त्या दोघीही शासकीय आश्रम शाळा, वैजापूर, ता. चोपडा, जि. जळगाव येथील विद्यार्थिनी आहेत. यावेळी महाराष्ट्र हॉकीच्या उपाध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे यांच्या हस्ते दोन्ही खेळाडूंना हॉकी स्टिक देऊन गौरविण्यात आले. तसेच, हॉकी जळगावतर्फे फारूक शेख यांनी त्यांना आवश्यक त्या इतर सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या.

याप्रसंगी हॉकी जळगावचे सचिव फारूक शेख, सहसचिव हिमाली बोरोले, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे, संचालिका वर्षा सोनवणे आणि पोलीस दलातील राष्ट्रीय खेळाडू किरण भिसे यांची उपस्थिती होती. या निवडीमुळे जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे.