जळगाव प्रतिनिधी | काल भाजपच्या उमेदवारांनी नाट्यमय पध्दतीत माघार घेतल्यानंतर आज चिन्ह वाटपाच्या आधी जिल्हा बँक निवडणुकीत दोन पॅनल आकारास आले आहेत. यात महाविकास आघाडीच्या पॅनलला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांचा समावेश असणारे पॅनल टक्कर देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जळगाव जिल्हा बँकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी नाट्यमय घडामोडी घडतांना दिसून येत आहे. यात माघारीच्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या मातब्बर उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने खळबळ उडाली. तर काल लढती निश्चीत झाल्यानंतर आज जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी चिन्हांचे वाटप केले. यात शामकांत बळीराम सोनवणे आणि विकास मुरलीधर पवार यांनी अनुक्रमे आठ आणि सात जागांसाठी दोन पॅनलची मागणी केली होती. यानुसार त्यांच्या दोन पॅनलला मान्यता देण्यात आल्याचे बिडवई यांनी सांगितले.
याप्रसंगी संतोष बिडवई म्हणाले की, शामकांत बळीराम सोनवणे यांच्या पॅनलमध्ये त्यांच्यासह जनाबाई गोंडू महाजन, विनोद पंडितराव पाटील, रोहिणी खडसे खेवलकर, गुलाबराव देवकर, शैलजादेवी दिलीपराव निकम, मेहताबसिंग रामसिंग नाईक, डॉ. सतीश भास्कररराव पाटील या आठ उमेदवारांचा समावेश असून त्यांना कप-बशी हे चिन्ह मिळाले आहे.
दरम्यान, विकास मुरलीधर पवार यांनी स्वतंत्र पॅनल तयार केले असून यात त्यांच्यासह अरूणा दिलीपराव पाटील, विकास ज्ञानेश्वर वाघ, कल्पना शांताराम पाटील, रवींद्र सूर्यभान पाटील, राजीव रघुनाथ पाटील आणि सुरेश शामराव पाटील यांचा समावेश आहे. या सात उमेदवारांना मोटारगाडी हे चिन्ह मिळाले आहे. यासोबत इतर उमेदवारांना अन्य चिन्हे प्रदान करण्यात आलेली आहेत.