जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाळधी येथे बांधकामाच्या ठिकाणी कामासाठी जात असतांना ट्रालाने कट मारल्याने रोडावर पडलेल्या दुचाकीवरील दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील बिबानगरजवळ शुक्रवारी २५ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हनिफ शहा आमान शहा (वय-२४) हा तरूण आपल्या परिवारासह नशिराबाद येथे वास्तव्याला आहे. इमारत बांधकामाच्या ठिकाणी मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. शुक्रवारी २५ ऑगस्ट रोजी सकाळी हानिफ हा दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीक्यू ५३८६) ने पाळधी येथे कामावर जाण्यासाठी रहेमान गुलाब शहा यांच्यास निघाला होता. सकाळी ९ वाजून ४५ मिनीटांच्या सुमारास बिबानगरजवळून राष्ट्रीय महामार्गावरून पाळधी येथे जात असतांना मागून येणारा ट्रालाने कट मारला. त्यामुळे दुचाकीवरील हनिफ शहा आणि रहेमान शहा हे दोघे जखमी झाले. यात रहेमान शहा यांच्या उजव्या हाताचा पंजा निकामी झाला आहे. जखमींना तातडीने खासगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.