शहादा येथे बहिणाबाई विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सवाचे आयोजन

youth festival

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सव १६ ते २० जानेवारी, २०२० या कालावधीत शहादा येथील पुज्य साने गुरुजी विद्या प्रसारक संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून होत असलेल्या जिल्हास्तरीय युवक महोत्सवा ऐवजी यंदा पुर्वीसारखा एकत्रित पाच दिवसांचा केंद्रीय महोत्सव होत आहे.

१६ ते २० जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवाचे उदघाटन अणूउर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष तथा राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते होणार आहे. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील अध्यक्षस्थानी राहतील. गेल्या दोन वर्षांपासून विद्यापीठाने पहिल्या टप्प्यात जिल्हास्तरीय युवक महोत्सव आणि त्यानंतर या जिल्हास्तरावरील प्रथम तीन विजेत्यांचा विद्यापीठस्तरीय महोत्सव असे स्वरुप ठेवले व त्याचे यशस्वी आयोजन केले. मात्र विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुन्हा या वर्षी पुर्वीसाररखा केंद्रीय युवक महोत्सव होत आहे. पाच कला प्रकारात २५ प्रकारच्या स्पर्धा होणार आहेत. त्यामध्ये संगीत कला प्रकारात शास्त्रीय गायन, शास्त्रीय तालवाद्य, सुरवाद्य, सुगम गायन भारतीय व पाश्चिमात्य, समुहगीत भारतीय व पाश्चिमात्य, लोकसंगीत, भारतीय लोकगीत या स्पर्धा होतील. नृत्यामध्ये समुह लोकनृत्य व शास्त्रीय नृत्य तसेच साहित्य कला प्रकारात वक्तृत्व, वादविवाद व काव्य वाचन स्पर्धा होतील. नाट्यामध्ये विडंबन, मुकनाट्य व मिमिक्री यांचा समावेश आहे. ललित कला मध्ये रांगोळी, चित्रकला, कोलाज, व्यंगचित्र, क्लेमॉडेलिंग, स्पॉट पेंटिग, फोटोग्राफी, मेहंदी या स्पर्धा होणार आहेत.अशी माहिती विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सत्यजित साळवे यांनी कळविले आहे.

Protected Content