शरद पवार म्हणतात अजितदादा आमचेच नेते !

बारामती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एकीकडे राष्ट्रवादीतील फुटीबाबत संभ्रमाचे वातावरण असतांना आता खुद्द शरद पवार यांनीच आमच्या पक्षात फुट पडली नसून अजितदादा हे आमचे नेते असल्याचे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

 

दोन दिवसांपासून खासदार सुप्रीया सुळे यांनी राष्ट्रवादीत कोणत्याही प्रकारची फुट पडलेली नसल्याचे दावे केले आहेत. यातच आता स्वत: शरद पवार यांनी केलेल्या भाष्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यातून पवारांच्या मनात नेमके आहे तरी काय हा प्रश्‍न देखील उपस्थित होत आहे.

 

शरद पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलतांना केलेले विधान लक्षवेधी ठरले आहे. सुप्रीया सुळे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारणा केली. यावर शरद पवार म्हणाले की, यात वादच नाही. फूट म्हणजे काय? पक्षात फूट कधी होते? जर पक्षातील एक गट वर्ग वेगळा झाला देश पातळीवर तर फूट पडली म्हणता येते. पण तशी स्थिती येथे नाही. पण कुणी पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर तसा निर्णय घेण्याचा लोकशाहीत त्यांना अधिकार आहे. त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे फूट पडली असं म्हणता येत नाही, असं शरद पवार याप्रसंगी म्हणाले.

 

शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत ते भविष्यात राहणार की नाही ? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. तर, अनेक नेत्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Protected Content