शिरागडला दर्शनासाठी आलेल्या दोघांचा तापी नदी बुडून मृत्यू

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील शिरागड येथे तापी नदीत देवी दर्शनासाठी आल्यावर अंघोळीसाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यु झाल्याची घटना घडली असुन यावल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे .

यावल तालुक्यातील शिरागड येथे तापी नदीच्या काठावर पंचक्रोशितील प्रसिद्ध सप्तशृंगी देवीचे मंदिर असुन या ठिकाणी दर्शनासाठी येणार्‍या भाविक भक्तांची नेहमीच गर्दी असते. या मंदिरावर दर्शनासाठी येणारे भाविक तापी नदीत अंघोळ करीत असतात. दरम्यान सोमवारी दिनांक १५ एप्रिल रोजी दुपारीच्या वेळेस शिरागड येथे रोहन काशिनाथ श्रीखंडे (वय १७ रा. रामानंद नगर जळगाव) व प्रथमेश शरद सोनवणे (वय १७ राहणार वाघनगर जळगाव) हे दोघे दर्शनासाठी आले होते.

त्यांनी दुपारी एक वाजेला देवीचे दर्शन घेतले व त्या नंतर ते तापी नदीच्या पात्रात अंघोळ करण्यास गेले दरम्यान दोन वाजेच्या सुमारास अचानक दोघे पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात बुडाले तेव्हा तातडीने त्यांना तिथून नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. यानंतर त्यांना यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले.

या ठिकाणी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून दोघांना मृत घोषित केले. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शरद शिवराम सोनवणे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन, घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तडवी,भरत कोळी करीत आहेत. दरम्यान, या दोन मुलांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Protected Content