काँग्रेस आमदारांना आमिष देण्याचा प्रयत्न ; केंद्रीय मंत्री शेखावत यांच्याविरुद्ध गुन्हा !

जयपूर (वृत्तसंस्था) जयपूरमधील भाजप नेते संजय जैन यांच्यामार्फत काँग्रेस आमदार भवरलाल शर्मा यांच्या संपर्कात राहून सरकार उलथण्यासाठी काँग्रेस आमदारांना लाच देण्याचा दावा एका ऑडीओ क्लिपमध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजप नेते आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

गुरुवारी एक धक्कादायक ऑडिओ क्लिप प्रसारमाध्यमांमधून समोर आली. यामध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, भाजप नेते संजय जैन आणि काँग्रेस आमदार भवरलाल शर्मा राजस्थान सरकार पाडण्यासाठी आमदारांना लाच देण्याविषयी बोलत आहेत, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत केला. एवढेच नव्हे तर त्यांनी राजस्थान सरकार आणि स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी) यांच्याकडे एफआयआर नोंदवून दोषींना अटक करावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजस्थानमधील सरकार पाडण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना पैशाचे आमिष दाखवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दरम्यान, मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. ऑडिओमध्ये माझा आवाज नाही, असा दावा शेखावत यांनी केला आहे.

Protected Content