तलवार घेवून फिरणाऱ्या दोघे ताब्यात; जिल्हापेठ पोलीसांची कारवाई

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बहिणाबाई चौधरी उद्यान परिसरात बेकायदेशीररित्या तलवार घेवून दुचाकीने फिरणाऱ्या दोन संशयितांवर शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता जिल्हापेठ पोलीसांनी कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दुचाकी आणि तलवार हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील बहिणाबाई चौधरी उद्यान परिसरात दोन जण हातात तलवार घेवून दुचाकीवर फिरत असल्याची माहिती जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पथकाने शनिवारी २४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता कारवाई करत संशयित आरोपी अक्षय दिलीप ठाकूर वय २३ रा. कांचन नगर, आणि भानू लक्ष्मीकांत बोरवा वय २३ रा. शिरसोली ता.जळगाव या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि तलवार हस्तगत केली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता पो.कॉ. मिलींद सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सलिम तडवी हे करीत आहे.

Protected Content