उद्या पुन्हा गजबजणार शाळा

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कोरोना काळात मागील दोन वर्षांपासून ऑनलाईन अभ्यास करणारे विद्यार्थी यावर्षी ऑफलाईन शाळेत शिक्षण घेण्यास सज्ज झाले आहेत. उद्यापासून जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळांची घंटा वाजणार आहे.

 

मागील दोन वर्षांपासून कोरोना काळामुळे शाळा बंद होत्या. मात्र, ऑनलाईन शिक्षण देण्यात येत होते. यात ग्रामीण परिसरात विद्यार्थ्यांना मोबाईलला रेंज नसणे या सारख्या अनेक तांत्रिक अडचणीचा सामना करावा लागला. यावर्षी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह ग्रामीण भागातील सर्व शाळा उद्या बुधवार दि.१५ जूनपासून ऑफलाईन पद्धतीने ३ हजार ३०५ शाळा सुरु होणार आहेत. यामुळे दोन वर्षानंतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पुन्हा किलबिलाट ऐकण्यास मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा देखील सज्ज झाल्या आहेत. यात सोमवारी व मंगळवारी असे दोन दिवस शाळांमध्ये साफसफाई, स्वच्छता करुन घेण्यात आली. उद्या बुधवार दि.१५ रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पहिली ते आठवीच्या १ लाख ५४ हजार ७४४ विद्यार्थ्यांना प्रत्येकी २ गणवेशचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच २४ लाख ६ हजार ६७७ पाठयपुस्तकांचे देखील प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्यासह शिक्षण विभागाचे अधिकारी, स्थानिक गावातील मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यात पालक संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्वतः जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया हे विद्यार्थ्यांमध्ये सहभागी होणार आहे.

Protected Content